११४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नोंदवला गेला अनोखा विक्रम
लंडन : पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डन २०२५ ची विजेती ठरली. इगा स्वियातेकने विम्बल्डन २०२५ महिला एकेरीचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला. सेंटर कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आठव्या मानांकित स्वियातेकने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवाला ६-०, ६-० असे हरवून तिचे पहिले विम्बल्डन विजेतेपद आणि एकूण सहावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले. इगाने सेमीफायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन सबालेन्काला देखील पराभवाचा धक्का दिला होता.
इगा स्वियातेक ही विम्बल्डनचे जेतेपद जिंकणारी पोलंडची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. स्वियातेकने केवळ ५७ मिनिटांत विजेतेपदाचा सामना जिंकला. ११४ वर्षांत पहिल्यांदाच अंतिम फेरीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी महिला खेळाडू एकही सेट जिंकू शकली नाही. २४ वर्षीय स्वियातेकने अंतिम फेरीत एकतर्फी कामगिरी करत अनिसिमोवाला फक्त ५७ मिनिटांत हरवलं. १९११ नंतर विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत हा पहिलाच ६-०, ६-० असा एकतर्फी विजय आहे, ज्यामुळे हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात एकतर्फी जेतेपदाच्या सामन्यांपैकी एक बनला आहे.
जेनिक सिनरची अंतिम फेरीत धडक
टेनिस जगतातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या विम्बल्डन २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत इटलीचा युवा टेनिसपटू जेनिक सिनर याने आपली दमदार हजेरी लावली आहे. त्याने सर्बियन दिग्गज नोवाक जोकोविचला उपांत्य फेरीत ६-३, ६-३, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता पुन्हा एकदा अंतिम फेरीत कार्लोस अल्काराझ आणि जेनिक सिनर यांच्यात जेतेपदासाठी लढत रंगणार आहे.
सिनरने या सामन्यात जोकोविचला पूर्णपणे बॅकफूटवर ठेवले. जोकोविचकडे २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी होती. पण सिनरमुळे त्याचे हे स्वप्न भंगले आहे.
या सामन्यात जोकोविचने दमदार सुरुवात केली. त्याने पहिला गेम आपल्या नावावर केला. त्यानंतर सिनरने पुनरागमन केले. तिसऱ्या गेममध्ये सिनरने ब्रेक पॉईंट मिळवत आघाडी घेतली. सिनरने हा सेट ६-४ ने आपल्या नावावर केला. दुसरा सेट सिनरने ६-३ ने नावावर केला. सरळ दोन सेट जिंकल्यानंतर तिसऱ्या सेट ६-४ ने आपल्या नावावर करत सरळ सेटमध्ये जोकोविचचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत सिनर विरुद्ध अल्काराझ लढत
विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील पुरुष एकेरीतील अंतिम सामना सिनर विरुद्ध अल्काराझ यांच्यात रंगणार आहे. अल्काराझने उपांत्य फेरीच्या सामन्यात टेलर फ्रित्झचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने हा सामना ६-४, ७-५, ६-३, ७-६ ने आपल्या नावावर केला. हे दोघे या आधीही फ्रेंच ओपन २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात आमनेसामने आले होते. या सामन्यात सिनरला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. पण शेवटी अल्काराझने कमबॅक करत फ्रेंच ओपन २०२५ स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले होते. त्यामुळे यावेळी सिनरकडे या पराभवाचा बदला घेण्याची संधी असणार आहे.