काहींच्या विरोधाला न जुमानता पालिका बैठकीत निर्णय
मडगाव : पालिका क्षेत्रातील व्यापार करासह इतर करवाढीवर २७ फेब्रुवारी रोजी मडगाव पालिकेत चर्चा झाली होती. शुक्रवारी झालेल्या पालिका बैठकीत २७ फेब्रुवारीच्या इतिवृत्तांना मंजुरी देत करवाढीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याला काही नगरसेवकांनी विरोध केला.
नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांनी यासंदर्भात स्पष्ट केले की, काही नगरसेवक राजकीय अजेंडा पुढे रेटत आहेत, मात्र करवाढीचा निर्णय आधीच चर्चेनंतर संमत करण्यात आलेला आहे.
शुक्रवारी झालेल्या पालिका बैठकीत पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पालिकेच्या इमारतीचे नूतनीकरण व दुरुस्ती, सोनसडो कचरा प्रकल्पातील कचरा हाताळणी आऊटसोर्स करणे, सुक्या कचर्यासाठी चार ट्रक खरेदी व १० टीपीडी क्षमतेचा गॅसिफिकेशन प्रकल्प उभारण्याचे नियोजन, सुमारे ७० स्टॉल असलेल्या बसस्थानकाच्या परिसरातचा पुनर्विकास जीसुडामार्फत केला जाणार असून, भाजी व फळ विक्रेत्यांसाठीही व्यवस्था करण्यात येणार आहे. लोहिया मैदान व पालिका सभागृह या ठिकाणांसाठी बुकिंगसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे. सोनसडोवर ग्रीन लंग्ज, शिरवडेतील फुटसाल मैदान, रोजंदारी कामगारांना मुदतवाढ आणि पूर्णवेळ वकीलाची नियुक्ती या विषयांवरही चर्चा झाली व निर्णय घेण्यात आले.
जुन्या मासळी मार्केटच्या जागेवर चार मजली हायड्रोलिक कार पार्किंग प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जीसुडाकडून साडेपाच कोटी रुपयांचा निधी आधीच मंजूर असून, आणखी साडेचार कोटी रुपये १४ व्या वित्त आयोगातून मंजूर झाले आहेत, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली.
पे पार्किंगसाठी पाच ठिकाणांची निवड
वाहनांच्या वाढत्या गर्दीला आळा बसावा यासाठी मडगाव पालिका क्षेत्रातील पाच ठिकाणी पे पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये चारचाकी वाहनांसाठी प्रतितास १० रुपये आणि दुचाकींसाठी ५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.