अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार; आरोपीला १० वर्षांचा कारावास

१.७० लाख रुपये दंड : जलदगती व पॉक्सो न्यायालयाचा निकाल


6 hours ago
अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार; आरोपीला १० वर्षांचा कारावास

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : मुरगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे २०२४ मध्ये अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. जलदगती व पॉक्सो न्यायालयाने मूळ झारखंड येथील १९ वर्षीय आरोपीला १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १.७० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा निवाडा न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.
या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, अल्पवयीन मुलीचे १७ मार्च २०२४ रोजी दुपारी २ ते पहाटे ६ दरम्यान संशयिताने अपहरण केले होते. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक कपील नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांनी गुन्हा दाखल केला. तपासाअंती पीडित मुलगी पंजाबमध्ये सापडली. तिची सुटका करून पोलिसांनी १४ एप्रिल २०२४ रोजी मूळ झारखंड येथील १९ वर्षीय आरोपीला अटक केली. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, पोलिसांनी गुन्ह्यात इतर कलमेही जोडली.
या प्रकरणी १५ मे २०२४ रोजी पॉक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात सरकारी अभियोक्ता अर्चना भोबे यांनी युक्तिवाद मांडले. त्यांनी आरोपीविरोधातील पुरावे सिद्ध केले. पीडित मुलीने दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. वैद्यकीय अहवाल व इतर पुराव्यांची दखल घेऊन पाॅक्सो न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ लाख ७० हजार रुपयांचा दंड, अशी ची शिक्षा ठोठावली
न्यायालयाने आरोपीला दिलेली शिक्षा
भा.दं.सं. कलम ३६३ अंतर्गत ७ वर्षांचा कारावास आणि २५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास ५ दिवसांची साधी कैद.
भा.दं.सं. कलम ३७६ अंतर्गत १० वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंड. दंड न भरल्यास १० दिवसांची साधी कैद.
भा.दं.सं. कलम ५०६(ii) अंतर्गत ७ वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपये दंड. दंड न भरल्यास ५ दिवसांची साधी कैद.
पॉक्सो कलम ४ अंतर्गत १० वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंड. दंड न भरल्यास १० दिवसांची साधी कैद.
पॉक्सो कलम ८ अंतर्गत ५ वर्षांचा कारावास आणि २५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास १० दिवसांची साधी कैद.
पॉक्सो कलम १२ अंतर्गत ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास १० दिवसांची साधी कैद.
आरोपी १४ एप्रिल २०२४ पासून, एक वर्ष २ महिने ४ दिवस कोठडीत असल्यामुळे तो कालावधी शिक्षेत समाविष्ट केला आहे.
वरील शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. दंडाची रक्कम जमा केल्यास पीडितेला द्यावी, असे नमूद आहे.                        

हेही वाचा