जुने गोवा पोलिसांची कारवाई : म्हापसा, पर्वरीत सोनसाखळी चोरीचा प्रयत्न
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : गोव्यात अलिकडच्या काळात सोनसाखळी हिसकावून नेणाऱ्या इराणी टोळीतील चोरांनी उच्छाद मांडला होता. या टोळीतील दोघा चोरांना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शेळपे-म्हापसा आणि सुकूर- पर्वरी येथे सोनसाखळ्या हिसकावण्याचा अयशस्वी प्रकार करणाऱ्या दोघा दुचाकीस्वार चोरांना मेरशी येथे जुने गोवे पोलिसांनी पर्वरी पोलिसांच्या साहाय्याने अवघ्या काही तासांतच शिताफीने अटक केली.
अब्बास अस्लम झैदी (३४, रा. ठाणे-महाराष्ट्र) व शरीफ शाहा (३३, रा. नाशिक-महाराष्ट्र) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गीता शिरोडकर (६२, रा. शेळपे म्हापसा) यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या टोळीने गोव्यातील विशेषकरून महिला व वृद्धांना आपले लक्ष्य बनवले होते. गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्याबरोबरच पोलीस असल्याचे खोटे सांगून संशयितांनी नागरिकांची लुबाडणूक केली असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.
शुक्रवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास पहिली घटना घडली. त्यानंतर दुसरी घटना सकाळी ९.४५ च्या दरम्यान सुकूर पर्वरी येथे घडली. फिर्यादी शिरोडकर या मॉर्निंग वॉकला जात होत्या. संशयित दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र शिरोडकर यांनी ते घट्ट पकडल्याने संशयितांना नेता आले नाही व संशयित पसार झाले. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर संशयित आरोपींनी सुकूर पर्वरी येथे पुन्हा एका ६५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. मात्र, ही सोनसाखळी बनावट होती.
सदर महिलेने आरडाओरड केली असता जवळील एका व्यक्तीने चोरांच्या दुचाकीचा क्रमांक नोंद केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी राज्यभरातील पोलिसांना सतर्क केले. संशयित चोरटे पणजीच्या दिशेने गेल्याचे समजताच पर्वरी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मेरशी येथे पोलीस पथकाला पाहून संशयितांनी दुचाकी टाकून धूम ठोकली. त्यातील एका संशयिताला पोलिसांनी पकडले. ‘अपनाघर’ परिसरातील शेतीमध्ये घुसलेल्या दुसऱ्या संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. पुढील तपास जुने गोवे पोलीस करत आहेत.
संशयितांचा आणखी तीन गुन्ह्यांत समावेश
चौकशीतून संशयित आरोपींचा आतापर्यंत आणखी तीन गुन्ह्यांमध्ये समावेश स्पष्ट झाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी भाटीवाडा, पर्रा येथे सुप्रिया दीपक शिरोडकर यांचे २ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरले होते. १७ एप्रिल रोजी कारास्कोवाडा, पर्रा येथील वैभवी वेंकटेश पेडणेकर यांच्या गळ्यातील २ लाखांचे मंगळसूत्र चोरले होते. याप्रकरणी म्हापसा पोलिसांत गुन्हे नोंद आहेत. १७ एप्रिल रोजी सेंट कायतानवाडा मेरशी येथे क्रिस्तालिना राॅड्रिग्ज (रा. बामणभाट मेरशी) यांच्या गळ्यातील ९५ हजारांची सोनसाखळी लांबवली होती. याप्रकरणी ओल्ड गोवा पोलीस गुन्हे नोंदवणार आहेत.