१५.२५ लाख रुपये किमतीच्या १३.१७२ ग्रॅम एक्स्टसी गोळ्या, ६१.७८७ ग्रॅम कोकेन जप्त
पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने दांडो-शिवोली येथे भाड्याच्या खोलीवर छापा टाकून नांबाँग फ्रेड कार्ल (२१) या कॅमेरून देशाच्या नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून १५.२५ लाख रुपये किमतीच्या १३.१७२ ग्रॅम एक्स्टसी गोळ्या आणि ६१.७८७ ग्रॅम कोकेन जप्त केले.
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, दांडो - शिवोली येथे भाड्याच्या खोलीत राहणारा विदेशी युवक ड्रग्ज तस्करीत गुंतल्याची माहिती गुप्तहेरांनी शाखेच्या अधिकाऱ्याला दिली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंगेश वळवईकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने १७ जुलै रोजी रात्री ११.५० ते १८ जुलै रोजी पहाटे ४.३० दरम्यान त्याच्या खोलीवर छापा टाकला. पथकाने नांबाँग फ्रेड कार्ल (२१) या कॅमेरून नागरिकाला ताब्यात घेतले. खोलीची झडती घेतली असता, १५.२५ लाख रुपये किमतीच्या १३.१७२ ग्रॅम एक्स्टसी गोळ्या आणि ६१.७८७ ग्रॅम कोकेन जप्त केले. गुन्हा शाखेने या प्रकरणी संशयित कार्ल याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम २१(बी), २२ (सी)अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला शुक्रवारी सायंकाळी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली.