मुलांना आपल्या मुळांशी जोडून ठेवायचं असेल तर त्यांना आपल्या लोकसंस्कृतीची ओळख करून देणं अत्यंत आवश्यक आहे कारण ही संस्कृती म्हणजे आपल्या पूर्वजांनी दिलेली एक अशी अमूल्य शिदोरी आहे जी शिकवते, जोडते आणि समृद्ध करते.
आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात आपली परंपरा, लोकसंस्कृती मागे पडत चालली आहे. विशेषतः आजची तरुण पिढी, शालेय विद्यार्थी आणि शहरांमध्ये राहणारी मुले आपल्या गावच्या परंपरा, सण-उत्सव, लोककथा, देव-देवतांविषयी फारशी माहिती ठेवत नाहीत. जर आपण आजच्या मुलांना विचारले की त्यांच्या गावात कोणते सण साजरे होतात? कोणती गाणी लग्नाच्या वेळी गायली जातात? गावाची ग्रामदेवता कोण आहे? तर बहुतांश वेळा आम्हाला उत्तर मिळत नाही; कारण आपली लोकसंस्कृती ही फक्त परंपरा नाही, तर ती आपल्या ओळखीची, संस्कारांची आणि सांस्कृतिक समृद्धीची मुळं आहेत.
लोकसंस्कृती म्हणजे आपल्या लोकांनी पिढ्यानपिढ्या जपलेली आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचवलेली सांस्कृतिक ठेव आहे. यात लोककथा, गाणी, ओव्या, सण-उत्सव, लोकनृत्य, ग्रामदेवता, परंपरा, व्रतवैकल्ये, खेळ, अंधश्रद्धा, धार्मिक समारंभ, जत्रा, पारंपरिक वेशभूषा आणि ग्रामीण भाषा यांचा समावेश होतो. ही संस्कृती पुस्तकात शिकवली जात नाही, तर ती अनुभवावी लागते.
दुर्दैवाने आधुनिक शिक्षणपद्धती आणि डिजिटल माध्यमांच्या अतिरेकामुळे आजची पिढी आपल्या मुळांपासून दुरावलेली आहे. मोबाईल, इंटरनेट यांच्यामुळे आपल्या गावात काय होतं, कोणते सण साजरे केले जायचे, कोणती गाणी गायली जायची याची माहिती मुलांना होत नाही. उलट 'हॅलोविन' (Halloween), 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine’s Day) साजरे करताना त्यांना रस वाटतो; पण झिम्मा-फुगडी, धालो, दसऱ्याच्या सोन्याच्या पानांची माहिती ही नसते. त्यामुळे आपल्या मुळांपासून दुरावलेली ही पिढी आपल्या ओळखीपासूनसुद्धा दुरावत चालली आहे.
ही ओळख टिकवण्यासाठी वडिलधाऱ्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. आजी-आजोबांनी आपल्या नातवंडांना आपल्या लहानपणीच्या गोष्टी सांगाव्यात. गावच्या देव-देवतांचे इतिहास सांगावेत, सण-उत्सवामागच्या कथा, दंतकथा, दैवतकथा सांगाव्यात. आई-वडिलांनी मुलांना गावच्या जत्रेत घेऊन जावे, पारंपरिक खेळ शिकवावेत आणि गावाच्या मातृदेवतेची ओळख करून द्यावी. आपल्या पिढीत जे साठवलेलं आहे ते पुढच्या पिढीकडे पोहचवले गेले पाहिजे.
फक्त कुटुंबच नाही, तर शाळा, शिक्षक, समाज यांचीही जबाबदारी आहे. शाळांमध्ये 'लोकसंस्कृती सप्ताह', 'लोककथा स्पर्धा', 'पारंपरिक वेशभूषा स्पर्धा', 'गावच्या लोककलाकारांच्या भेटी' यांसारखे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. विद्यार्थ्यांना प्रकल्पाद्वारे त्यांच्या आजी-आजोबांकडून एखादी लोककथा लिहून आणायला सांगितली पाहिजे. गावातल्या जत्रेचे चित्रण करायला सांगावे. त्यामुळे मुलांमध्ये जिज्ञासा वाढेल आणि लोकसंस्कृतीची रुची निर्माण होईल.
तंत्रज्ञानाच्या युगात लोकसंस्कृती जपण्याचे आधुनिक मार्गही आहेत. उदाहरणार्थ, गावातल्या लोककथांचे ऑडिओ, व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करता येतील. गावच्या गाण्यांची रेकॉर्डिंग करून यूट्यूब चॅनलवर अपलोड करता येईल. गावच्या देवीची जत्रा, उत्सव, पूजा यांची माहिती ब्लॉग, पॉडकास्टमधून प्रसारित करता येईल. मात्र हे शक्य होण्यासाठी आधी ती लोकसंस्कृती समजून घ्यावी लागेल, अनुभवावी लागेल आणि जपावी लागेल. म्हणूनच आपण सर्वांनी, वडीलधारी मंडळी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांनी एकत्र येऊन आपल्या गावच्या, आपल्या मातीच्या लोकसंस्कृतीचा जागर करायला हवा. ही आपली खरी ओळख आहे. ती टिकवणं ही काळाची गरज आहे. मुलांना आपल्या मुळांशी जोडून ठेवायचं असेल तर त्यांना आपल्या लोकसंस्कृतीची ओळख करून देणं अत्यंत आवश्यक आहे; कारण ही संस्कृती म्हणजे आपल्या पूर्वजांनी दिलेली एक अशी अमूल्य शिदोरी आहे जी शिकवते, जोडते आणि समृद्ध करते.
- वर्धा हरमलकर
भांडोल