​'नियाज भाईंच्या आठवणी’

कोकणातील एका गावातील मांसाहार आणि विशेषतः नियाज अन्सारी नावाच्या शांत, संयमी आणि मनमिळाऊ मटणवाल्याच्या आठवणींचे हे सुरेख शब्दचित्र रेखाटले आहे.

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
22nd August, 09:56 pm
​'नियाज भाईंच्या आठवणी’

आता जरा वळूया आमच्या कोकणाकडे. साऱ्या जगात कॉमन असणाऱ्या ह्या मूलभूत गरजांना कोकणात मात्र फाटे फुटतात. म्हणजे काय की वस्त्र आणि निवाऱ्याच्या बाबतीत आम्ही तसे उदासीन असू, पण अन्नाबाबत मात्र भलतेच जागरूक हो! "खाऊ तर सागोतीशी नाही तर संग धरू उपासाशी" हा आमचा बाणा. पक्वान्न नको पण सोमवार सोडून रोज मासे आणि आयतवारी (रविवारी) मात्र मटण, चिकन हवं ते हवं.

​अर्थात, आमचे गावही याला अपवाद नव्हते. बाबल भट, त्याचा काका आणि नुकताच अमेरिकेत जाऊन आला म्हणून बाटल्याबद्दल प्रायश्चित्त घेण्यासाठी वारकरी झालेला आमचा जनापा एवढे सोडले, तर बाकी सर्व घरे ही १०० टक्के मांसाहारी. रविवार म्हटला की मटण, कोंबडी हे आलेच. सकाळी लवकर उठून नियाज मटणवाल्याकडे रांग लावणे हा रविवारचा प्रत्येक घराचा कुळाचारच ना म्हणा हवे तर.

​तर आमचा मटणवाला नियाज् ऊर्फ नियाज अन्सारी. आमच्या आणि आसपासच्या काही गावांची मटण, कोंबडीची गरज भागवणारा असा हा नियाज. खुराटी दाढी, डोक्याला टक्कल, मूळ रंग न कळण्याइतपत मळलेले बनियन आणि खाली पट्टेरी लुंगी (आता हाफ पॅन्ट). असा हा नियाज आठवड्याचे ६ दिवस तसा जास्त दिसायचा नाही गावात, पण रविवारी मात्र दुपारी १२/१ पर्यंत नियाजचा नियाजभाई असायचा. सकाळी चार-दोन बकरे मारून, सोलून, टांगून ठेवायचा. बाजूला खुराड्यात गावठी आणि इंग्लिश कोंबड्या, ज्या आदल्या दिवशी बेळगाववरून आलेल्या असत. सकाळी सात वाजल्यापासून नियाजचे एका मोठ्या लाकडी ओंडक्यासमोर बसून 'खाट खुट' चालू असे. कोणाला मांडी तर कोणाला कलेजी काय नि काय. नुसता कालवा असायचा. नियाजने आपल्या वाट्याला दोन कलेजीचे तुकडे जास्त घालणं म्हणजे मोठा मान हो! अर्थात सगळ्या गावाचे लाड पुरवता पुरवता तोही तंग होत असे. पण खूप संयमी, कधी कोणावर चिडणार नाही, पैशांकरता हुज्जत घालणार नाही, उरलेले पैसे नंतर दे असा स्वभाव. विचारले तर म्हणायचा "मेळता मा, भोत हो गया", अर्धी मालवणी आणि अर्धी हिंदी, जाम मजा यायची त्याची भाषा ऐकताना.

​नियाज हा मूळ तसा आमच्याच गावातला. त्याचे कोणते पूर्वज गावात आले आणि स्थायिक झाले हे त्यालाच काय, खुद्द गावालासुद्धा माहीत नव्हते. बाप गावच्या बाजारात बकरे मारायचा. पार आंबोलीपर्यंत जायचा. घरात शिक्षण म्हणजे फक्त पैसे मोजण्याइतपतच. बाकी सगळी लिखापढी ही गावच्या पोस्टमनकडून अथवा आमच्या सासऱ्यांकडून. नियाजही त्याला अपवाद नव्हता. दर रविवारी मटण न सांगता आमच्याकडे घरपोच मिळायचे, तेसुद्धा कलेजीच्या मोठ्या बम्पर डिस्काउंटसोबत.

​नियाजचा एक भाऊ ड्रायव्हर होता. नियाजही तसा कलाकार माणूस, चांगला रंगारी. श्रावणात तसा धंदा कमी त्याचा. मग बाप्पाच्या आगमनाआधी घरावर एक रंगाचा हात फिरवण्याचं काम त्याचेच. काम चोख, पण रंगात जरा गडबड होत असे. गुलाबीच्या जागी लाल, पोपटीच्या जागी हिरवा होत असे. पण गावच ते, चालायचेच. नियाजची बेगम मैताबी. सगळे मैताबी म्हणत तिला. चांगले सुंदर मेहताबबी नाव तिचे. पण आम्ही कधी कोणाचे नाव सरळ घेतले तर ना! आणि अर्थात, नावाप्रमाणे ती तशी नव्हतीही. मेहताबचा अर्थ शीतल चंद्रप्रकाश. आणि ही अगदी उलट. नियाज जेवढा शांत, तेवढी ही भांडकुदळ. प्रत्येक वेळेस नियाजलाच मधे पडावे लागे. पण आपल्या स्वभावानुसार तो कोणतेही प्रकरण जास्त वाढवत नसे.

​गावात तसे अनेक होते पैशांसाठी कटकट करणारे. पण नियाजच्या बाबतीत तसे फारसे होत नसे. कारण एकच, आज जर त्याला पैसे दिले नाहीत मटणाचे, तर पुढल्या रविवारचे काय? अर्थात, नियाजही ओळखून होता. आजचे पैसे उद्या येणार ही गँरटी, आणि धरा नाहीच आले तर मग मासाच्या जागी हाडेच जास्त पडायची.

​रोजचा नमाजी नियाज दर सोमवारी रवळनाथ मंदिराबाहेर उभा राहून देवाला नमस्कार करायचा. कधी चुकला नाही. आपण स्वतः अनपढ पण दोन्ही मुलांना शिकवले त्याने. मोठा फजलु कोल्हापुरात शिकला. तलाठी झाला. पण बापासारखाच शांत. कोणाचे कसलेही काम असो, नाही म्हणणार नाही. नियाजची दोन्ही मुले तशी बापाच्या वळणावर होती.

​तसा पंचक्रोशीत फेमस नियाज मटणवाला. पार लांबून सायकलवरून माणसे येत मटण न्यायला. नियाजनेही कधी कोणाला नाराज केले नाही. पण आता नाही जमत. हातच चालत नाही म्हणतो. मुले शिकली, धाकटा काकाबरोबर जातो गाडीवर. दोघांनी अब्बुला गप घरात आराम करायला सांगितले आहे. अर्थात, आता मटण परवडतय तरी कुठे हो! तरी मग कधी वाडीला जाऊन आणतात हे. पण सर नाही हो त्याला नियाज भाईच्या मटणाची.

​कधी कधी येतो आमच्याकडे यजमानांशी गप्पा मारायला. तसे बालमित्रच ते. गावठी पानांची लांब विडी ओढत बसणार ओसरीवर जुन्या आठवणींना उजाळा देत. दिवस चालले आहेत. फरक पडलाय. मटण परवडत नाही, कोंबडी आली. आता तर काय पाकीटच येतात. डायरेक्ट रेडी. परवा नियाजच सांगत होता, "फजलुके बिबिने बिना हाड्डीका कोंबडी लाया. अब्बी हाड्डी चबाने का झंझट ही नय!" ऐकून मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला मी..


- रेशम जयंत झारापकर

मडगाव, गोवा.