माझं प्रेरणास्थान माझ्या शिक्षिका

५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांच्या अमूल्य योगदानाला सन्मानित करणारा हा दिवस. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला योग्य आकार देणाऱ्या शिक्षकांना माझा सलाम.

Story: प्रेरणा |
16 hours ago
माझं प्रेरणास्थान माझ्या  शिक्षिका

एक शिक्षक केवळ पुस्तकातील धडेच नव्हे, तर आयुष्यातील अनेक महत्त्वाचे धडेही शिकवतो. शिक्षकाला कितीही वैयक्तिक अडचणी असल्या तरी तो वर्गात गेल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आपसूक हसू येतं, कारण मुलांचा सहवास त्याला आनंद देतो. अशाच नेहमी हसणाऱ्या माझ्या शिक्षिकेबद्दल सांगायला माझ्याकडे खूप काही आहे.

आई-वडिलांनंतर शिक्षक आपले गुरु असतात आणि शाळा हे आपलं दुसरं घर असतं, असं मी फक्त ऐकलं होतं. पण जेव्हा मी वाडे नगर शाळेत गेले, तेव्हा याचा मला खऱ्या अर्थाने अनुभव आला. अशा माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुमची सदैव ऋणी असेन.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी शिक्षक/शिक्षिका असते जी आपल्या विद्यार्थ्याला पावलोपावली मदत करते. सुदैवाने माझ्याही आयुष्यात अशी एक शिक्षिका आहे. त्या म्हणजे २०१८ साली सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार प्राप्त झालेल्या अनुजा वेर्णेकर मिस. त्यांच्याबद्दल सांगायला शब्दही कमी पडतील. अशा माझ्या प्रेमळ शिक्षिकेबद्दल सांगताना मन भरून येतं. कारण आमचा पाठ्यपुस्तकाचा सहवास फक्त दोन वर्षांचा असला तरी आम्ही मनाने आयुष्यभरासाठी जोडले गेलो आहोत. आयुष्य खूप सुंदर आहे, या सुंदर आयुष्याच्या वाटेवर खूप काटे आहेत, पण त्या काट्यांना दूर करून आपलं आयुष्य कसं मौल्यवान बनवायचं, हे त्यांनी मला शिकवलं.

तुम्ही आजपर्यंत मला कायम साथ दिली. माझ्या प्रत्येक प्रयत्नात तुमचाही मोलाचा वाटा आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. तुमच्या प्रत्येक गोष्टीतून मला एक नवीन बळ मिळायचं आणि ते आजही मिळतं. आज मी जिथे कुठे आहे, जे काही प्राप्त केलंय त्यामागे तुमचाच हात आहे. जरी आम्ही एकमेकांपासून दूर असलो तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेले आहोतच. मला कधीही काही अडचण आली तर तुमच्याशी मनमोकळेपणाने संपर्क साधावा असं हे आपलं नातं आणि माझा हा ठाम विश्वास आहे की तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असाल.

माझ्या छोट्या-छोट्या यशात तुमचा सहभाग होता, आजही आहे आणि आयुष्यभरही असेल याची मला खात्री आहे. दोन वर्षांनंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी अनेक ठिकाणी गेले. तिथेही मी माझ्या मित्र-मैत्रिणींना तुमच्याबद्दल आवर्जून सांगायचे, त्यामुळे त्यांनाही तुमचं नाव तोंडपाठ झालं आहे. त्यांच्यासमोर मी तुमचं भरभरून कौतुक करायचे आणि तेही मला म्हणायचे की, "तू खूप भाग्यवान आहेस की तुला एवढी प्रेमळ शिक्षिका मिळाली."

निळ्या शाईपासून लाल शाईकडेच्या प्रवासातही तुमच्या प्रेरणेचे धडे माझ्यासोबत होते. माझ्या आई-वडिलांनंतर गुरु म्हणून तुम्हीच माझ्या जीवनाला सतत नवे वळण देत आहात. आणि महत्त्वाचं म्हणजे, मुलांना मारून किंवा रागावून नाही, तर प्रेमानेही समजावता येतं आणि प्रेमाची भाषा मुलं लवकर आत्मसात करतात, हे मी तुमच्याकडूनच शिकले. आज एक शिक्षिका म्हणून हीच पद्धत मी माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत वापरते.

कधीही चुकल्यावर प्रेमाने समजावून सांगणाऱ्या, कुठलीही गोष्ट समजली नाही तरी संयमाने पुन्हा पुन्हा सांगणाऱ्या, आईसारखी माया आणि काळजी घेणाऱ्या, सगळ्यांच्या विरोधात जाऊन माझी साथ देणाऱ्या अशा माझ्या आवडत्या आणि माझ्या प्रेरणास्थान असलेल्या शिक्षिकेला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.


रूपल ल. पंडित

वास्को