प्रसूतीनंतरची काळजी आईच्या आरोग्याचा पाया

मला सर्वात महत्त्वाचं वाटलं ते मानसिक आरोग्याची काळजी घेणं. हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे कधी कधी मन खट्टू होतं, अशावेळी कुटुंबीयांशी बोलणं आणि त्यांचं साथ देणं खूप ताकद देणारं असतं. स्वतःसाठी काही क्षण काढून वाचन, संगीत ऐकणे किंवा आवडत्या गोष्टी करणे यामुळेही मानसिक ताण कमी होतो.

Story: लेखणी |
22nd August, 09:54 pm
प्रसूतीनंतरची काळजी  आईच्या आरोग्याचा पाया

प्रसूती हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि भावनिक टप्पा असतो. अलीकडेच मी स्वतः आई झाले आणि या काळात किती शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला. बाळाच्या जन्मानंतर आपलं संपूर्ण लक्ष नवजात बाळावर केंद्रित होतं, पण त्याच वेळी आईच्या आरोग्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे, हे मला जाणवलं. शरीराला प्रसूतीनंतर पुनः शक्ती मिळवण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. डाळी, हिरव्या पालेभाज्या, दूध, तूप, सुकेमेवे आणि ताजे फळे यांचा समावेश केल्याने ऊर्जा टिकून राहते आणि स्तनपान सुरळीत होतं. पुरेसं पाणी आणि द्रवपदार्थ घेणंदेखील महत्त्वाचं आहे. या काळात विश्रांती हे माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते. बाळ झोपलं की मीही झोपायचा प्रयत्न करत होते, कारण सततच्या जागरणामुळे थकवा आणि चिडचिड होऊ शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलके चालणे आणि श्वसनाचे व्यायाम सुरू केल्याने शरीराची ताकद हळूहळू परत मिळू लागली. मात्र, मला सर्वात महत्त्वाचं वाटलं ते मानसिक आरोग्याची काळजी घेणं. हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलामुळे कधी कधी मन खट्टू होतं, अशावेळी कुटुंबीयांशी बोलणं आणि त्यांचं साथ देणं खूप ताकद देणारं असतं. स्वतःसाठी काही क्षण काढून वाचन, संगीत ऐकणे किंवा आवडत्या गोष्टी करणे यामुळेही मानसिक ताण कमी होतो. 

प्रसूतीनंतर नियमित वैद्यकीय तपासणी करणे देखील गरजेचे आहे, कारण त्यामुळे आरोग्यातील बदल लवकर ओळखता येतात. माझा अनुभव असा की, प्रसूतीनंतरची योग्य काळजी ही केवळ आईच्या आरोग्यासाठीच नाही तर बाळाच्या संगोपनासाठीही महत्त्वाची आहे. निरोगी, आनंदी आणि ऊर्जावान आईच आपल्या बाळाला उत्तम प्रेम, संरक्षण आणि काळजी देऊ शकते.


- तृप्ती दत्तदीप गावस  

सहाय्यक प्राध्यापिका