गणेशोत्सव हा आपल्या प्रत्येकाच्या मनाशी निगडित असलेला सर्वात प्रिय सण आहे. “गणपती बाप्पा मोरया” च्या गजराने वातावरण दुमदुमते आणि घराघरांत आनंदाचे वातावरण निर्माण होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून या सणाचे स्वरूप बदलले असून त्याचा परिणाम आपल्या निसर्गावरही जाणवू लागला आहे.
अाज बहुतेक ठिकाणी गणेश मूर्तींसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. या मूर्ती सुंदर व हलक्या असतात, पण त्यांचा परिणाम जलस्रोतांवर आणि पर्यावरणावर अतिशय घातक ठरतो. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात सहज विरघळत नाही, त्यामुळे तलाव, नद्या, समुद्र यांचे पाणी दूषित होते. त्यातून मासे, जलीय प्राणी यांचे जीवन धोक्यात येते आणि शेवटी मानवाच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो.
याउलट पारंपरिक मातीच्या मूर्ती पूर्णपणे नैसर्गिक असतात. विसर्जनानंतर त्या सहज मातीमध्ये मिसळतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत. आज अनेक शिल्पकार पर्यावरणपूरक रंगांचा व नैसर्गिक साहित्याचा वापर करून मूर्ती तयार करतात. अशा मूर्तींचा अवलंब करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गणेश हा विघ्नहर्ता आहे. आपणच जर आपल्या निसर्गाला विघ्ने निर्माण केली, तर तो कसा प्रसन्न होईल? म्हणूनच आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि निरोगी निसर्ग जपणे ही आपली जबाबदारी आहे.
चला तर मग, या गणेशोत्सवापासून संकल्प करूया – “पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू, निसर्गाचे रक्षण करू!”
तृप्ती दत्तदीप गावस
सहाय्यक प्राध्यापिका