श्रीकृष्णाच्या विचारांनी घडवूया चांगला समाज

जी संकटांवर मात करतात, जी नात्यांना मान देतात आणि जी स्वतःवर विश्वास ठेवतात अशी माणसे आज जगाला हवी आहेत. कारण श्रीकृष्ण म्हणतात, 'कर्म करत रहा' आणि त्यामुळे प्रत्येक माणसाच्या कर्मात प्रामाणिकता असली पाहिजे. तेव्हाच जगाला हवी असणारी कृष्णासारखी माणसे भेटतील.

Story: विशेष |
22nd August, 09:48 pm
श्रीकृष्णाच्या विचारांनी घडवूया चांगला समाज

आजचे जग म्हटले की सगळीकडे दिसते ती धावपळ, गडबड आणि वेळ नसलेली माणसं. माणूस आज आधुनिकीकरणाच्या इतका जवळ गेलेला आहे की तो आपले संस्कार विसरत चाललेला आहे. आजचा काळ इतक्या झपाट्याने बदलत आहे की नात्यांमध्ये असलेले प्रेम, आपुलकी, विश्वास यांचा अंत होत आहे. आज माणूस एखाद्याला मदतीचा हात द्यायला मागेपुढे पाहतो. दुसऱ्याला नावे ठेवण्यास, दुसऱ्याच्या प्रगतीची घृणा मनात व्यक्त करण्यास सतत तत्पर असलेला दिसतो. पण माणूस आज प्रेम व जिव्हाळ्याने समाजातील लोकांना पाहताना दिसत नाही. 

परंतु समाजातील प्रत्येक व्यक्तीने जर विचार केला तर आज या गोंधळलेल्या जगाला मार्ग दाखविण्यासाठी आपले पौराणिक देव - देवता यांना महत्त्व देणे गरजेचे आहे. त्यामध्ये एक म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाला आपण देव मानतो. कृष्णाच्या खोड्यांमुळे व त्याच्या भोळेपणामुळे त्याला नटखट असे म्हटले जाते‌. आज जगातील लोकांना मार्ग दाखवण्यासाठी युक्तीवादी आणि धैर्यवादी श्रीकृष्णाचे विचार आत्मसात करणे हे एकमेव साधन आहे. तेव्हाच श्रीकृष्णाच्या‌ विचाराने समाज चांगल्या माणसांनी बहरू शकेल.

आज सर्वत्र जगाला श्रीकृष्णासारखी माणसे हवी आहेत. अशी माणसे जी अन्यायात दबून न जाता लढत राहतील, अशी माणसे जी निरागसपणे प्रेम करतील पण न्यायासाठी लढतील, जी मनात द्वेष, ईर्ष्या यासारख्या भावना न बाळगता एकमेकांना समजून घेतील. अशाप्रकारचे कार्य जर प्रत्येकाकडून घडले तर खरोखर जगातील वाईट गोष्टींचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. 

श्रीकृष्णाचे बालपण हे मस्करी, खोड्या करण्यात गेले होते. अर्थातच, कृष्ण म्हटला की आपल्याला आठवतो तो त्याचा माखन चोरण्याचा स्वभाव आणि गोपिकांबरोबरची रास. ही केवळ बालखोडी नसून, प्रेम, आनंद आणि भक्तिभावाचे प्रतीक आहे. अशा स्वभावाचा कृष्ण असला तरीही रणांगणावर अर्जुनाला गीता सांगणारा, धर्माचा गूढार्थ उलगडणारा कृष्ण त्याच्या लाघवी स्वभावापासून वेगळा वाटतो. पण आजची पिढी कृष्णाच्या या दुहेरी स्वभावाला आत्मसात करू शकते की नाही? हा आज समाजापुढे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. 

आपण नेहमी म्हणत असतो की आज सगळीकडे भ्रष्टाचार चालतो, बलात्कार होतात, सत्तेचा गैरवापर केला जातो, मुलींना स्वातंत्र्य मिळत नाही, माणसे खोटी वागतात. पण श्रीकृष्ण म्हणतात की,  'स्वतःपासून सुरू करा' पण आपण असे करतो का? अर्थातच नाही. प्रेम करा, सत्य बोला, लढा असे विचार श्रीकृष्णाने दिले पण समाजाने या विचारांवर दुर्लक्ष केले आणि म्हणूनच आज प्रत्येकवेळी समाजात वाईट गोष्टी घडताना दिसतात. 

जी संकटांवर मात करतात, जी नात्यांना मान देतात आणि जी स्वतःवर विश्वास ठेवतात अशी माणसे आज जगाला हवी आहेत. कारण श्रीकृष्ण म्हणतात, 'कर्म करत रहा' आणि त्यामुळे प्रत्येक माणसाच्या कर्मात प्रामाणिकता असली पाहिजे. तेव्हाच जगाला हवी असणारी कृष्णासारखी माणसे भेटतील. कारण शेवटी, देव जरी मंदिरात असला, मंदिरात जाऊन आपण पूजाअर्चा केली तरीही श्रीकृष्णासारखे माणूस बनणे हेच देवाचे खरे रूप आहे.

प्रत्येक माणूस मग तो छोटा असो किंवा मोठा प्रत्येकाने एकमेकांना समजून, सांभाळून घेत पाहिजे. दुसऱ्याबरोबर चांगुलपणाने वागण्यात जो आनंद मिळतो तो अनमोल असतो. समाजातील काही लोक गर्वाने वागत असतात. पण जर आपण स्वतःहून असे विचार बदलायला सुरुवात केली तर नक्कीच समाजात सकारात्मकतेचे बीज उगवेल.  म्हणूनच, कर्म करा, विश्वास बाळगा, स्वतःला चांगलं माणूस बनविण्यासाठी श्रीकृष्णाचे विचार आत्मसात करा!



- पूजा भिवा परब
पालये-पेडणे