ह्या वादळात त्या आईची ओळख हरवू नये, ही जबाबदारी आपली असते. कारण प्रत्येक बाळाच्या जन्माबरोबर एक आई जन्म घेते, पण त्या आईचं माणूसपण जपणं, हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.
तिचा चेहरा थकलेला नव्हता, तो हरवलेला होता. डोळ्यांत बाळासाठीचा आनंद नव्हता, औदासिन्य होतं. ती म्हणाली, “माझं बाळ सुंदर आहे... पण मी त्याचं आईपण स्वीकारूच शकत नाहीये!”
पाहायला गेलं, तर घर सुसज्ज होतं, बाळ निरोगी, सासरची माणसं मदतीला तयार, नवरा समजूतदार. पण तिच्या मनात सतत एक अधांतरी रुखरुख.
“मी चुकतेय का?”
“मला आई होऊनसुद्धा काहीच विशेष का वाटत नाहीये?”
“बाळ रडतं तेव्हा माझी भयंकर चिडचिड होते. मग मी स्वतःला दोष देते. मग मी रडते. आणि मग मी पुन्हा गप्प बसते.”
बाळ जन्मल्यावर स्वतःच्या शरीरावरच तिला राग यायचा. इतकं का दुखतं? का झोप लागत नाही? का रडायला येतं सतत?
ही गोष्ट एकट्या फक्त तिची नाही.
ही जगभरातील दर दहापैकी एका स्त्रीची गोष्ट आहे.
हेच ते पोस्टपार्टम डिप्रेशन!
गर्भधारणेनंतर आणि प्रसवोत्तर काळात, स्त्रीच्या शरीरात प्रचंड जैविक उलथापालथ होत असते. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन सारखे हार्मोन्स अचानक कमी होतात व मेंदूतील सेरेटाॅनिनचा समतोल ढासळतो. त्यात प्रसूतीनंतरचा थकवा, रात्रीच्या झोपेचा अभाव, स्वतःसाठी वेळ नसणं, एकटेपणाची भावना आणि सामाजिक अपेक्षांचा भार या सगळ्यांचा नकळत तिच्या मनावर परिणाम होतो.
एकूण काय तर, एखादी स्त्री ‘आई’ झाल्यावर तिच्या ‘माणूस’ असण्याच्या परवानगीला समाज विसरून जातो व ह्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ती तिचं अस्तित्व हरवू लागते. आणि हेच ते पोस्टपार्टम डिप्रेशन अर्थात प्रसूतीनंतर उद्भवणारी मानसिक उदासीनता होय.
लक्षणं खालील प्रमाणे :
बाळाबद्दल अनाहूत दुरावा.
स्वतःबद्दल अपराधी भावना – “मी चांगली आई नाही”
झोप न येणं, अन्नाची इच्छा न उरणं.
अश्रूंचा थांबता न येणारा ओघ.
कधी कधी... सगळं सोडून पळून जावं असं वाटणं
बाळाला कुशीत घेताना गुदमरल्यासारखं वाटणं.
माझ्या एका क्लायंटने तर अगदी भेदकपणे सांगितलं, ही लक्षणं खूप जणींना अनुभवास येतात पण त्याविषयी बोलणं अथवा व्यक्त होणे गुन्हा मानलं जातं.
पण का सांगता येत नाही?
कारण आई या शब्दाशी आपण एक आदर्श चिकटवतो, प्रेमळ, समर्पित, कायम आनंदी. आणि म्हणूनच, जेव्हा एखादी स्त्री ‘माझं मन खचतंय’ असं म्हणते, तेव्हा तिला दिलं जातं दोषाचं प्रमाणपत्र. नवरा असो, सासू असो की मैत्रीण, सगळे तिचं आईपण तर पाहतात, पण माणूसपण विसरतात. ह्यात “सगळ्याच बायका आई होतात, त्यात काय विशेष?” हे ऐकल्यावर त्या नव्या आईचं मन कुठे जाऊन कोसळतं, हे मात्र कधीच कुणाला कळत नाही.
अशावेळी आपण, एक स्त्री, एक नवरा, सासू-सासरे, मैत्रीण किंवा नातलग म्हणून काय करू शकतो?
तिचं म्हणणं ऐकून घेणं : तिला दोष न लावता, समजून घेणं.
तिच्यासोबत वेळ घालवणं : बाळाची जबाबदारी वाटून घेणं.
तिच्या व्यथा लहान न मानता, त्या दखलपात्र आहेत हे जाणणं : सासू-सासरे म्हणून, “आमच्या काळात असं नव्हतं” असं न म्हणता, “तू ठीक आहेस का?” असं विचारा.
गरज पडल्यास समुपदेशकाची मदत घेणं : गरोदरपणात मानसिक आरोग्याबाबतही चर्चा व्हावी.
”आई म्हणजे देवी” ह्या उपमांमधून तिला माणूस म्हणून बघणं : तिला थकायला, चिडायला, रडायला स्पेस देणं.
एक नातलग म्हणून : फक्त बाळाला पाहायला न जाता, आईचं मनही ऐका. तिला एकटे पाडू नका.
“बाळ जन्माला येणं म्हणजे नव्या जीवनाचा आनंद, नाही का?” होय. ते खरंय. परंतु मातृत्व म्हणजे झुळूक नाही, वादळही असतं. त्यामुळे ह्या वादळात त्या आईची ओळख हरवू नये, ही जबाबदारी आपली असते. कारण प्रत्येक बाळाच्या जन्माबरोबर एक आई जन्म घेते, पण त्या आईचं माणूसपण जपणं, हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.
- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४