मेहंदी ही केवळ सौंदर्य नव्हे तर एक प्रकारचा आत्मविश्वास आणि आनंद देणारे माध्यम आहे. ज्या हातांवर मेहंदीची सुंदर डिझाईन्स उमटतात, त्यांच्या चेहऱ्यावर हास्यदेखील खुलते. आणि त्या हास्यामागे असतो एक कलाकार.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मेहंदीला विशेष महत्त्व आहे. विवाहसोहळा असो, सण-उत्सव असो वा एखादा खास दिवस, महिलांच्या सौंदर्यात भर घालणारी मेहंदी ही एक पारंपरिक कला आहे. पूर्वी केवळ सौंदर्यासाठी वापरली जाणारी ही कला आता एक उत्तम करिअरचा पर्याय बनत आहे.
आजकाल अनेक तरुणी व गृहिणी आपली सर्जनशीलता आणि कलात्मकतेच्या आधारे मेहंदी डिझायनिंगमध्ये आपले भविष्य शोधू लागल्या आहेत. कारण ही कला शिकण्यासाठी फारसा खर्च लागत नाही आणि कमाईच्या अनेक संधी निर्माण होतात. मेहंदी डिझायनिंगसाठी केवळ अभ्यास, सातत्याने सराव, सौंदर्यदृष्टी आणि नावीन्यपूर्ण विचारसरणी आवश्यक आहे.
विवाहसमारंभांमध्ये वधूच्या हातांना मेहंदी लावणे ही अनिवार्य परंपरा आहे. अशा वेळी कुशल मेहंदी कलाकारांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय दिवाळी, ईद, भाऊबीज, करवा चौथ, बेबी शॉवर अशा अनेक प्रसंगांसाठी महिलांना मेहंदी लावण्याची हौस असते.
लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे — हा महिना अध्यात्म, श्रद्धा आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम असलेला काळ आहे. या महिन्यात नागपंचमी, मंगळागौर, हरितालिका, रक्षाबंधन यांसारखे सण येतात, ज्या दिवशी महिला पारंपरिक वेशात सजून-धजून मेहंदी लावण्यास प्राधान्य देतात. विशेषतः मंगळागौर उत्सवांमध्ये मेहंदी लावणे ही एक सांस्कृतिक परंपरा बनली आहे. त्यामुळे या काळात मेहंदी कलाकारांसाठी संधीचे दरवाजे खुले आहेत.
ही संधी ओळखून अनेकांनी या क्षेत्रात व्यवसाय सुरू केले आहेत. काही जण घरी बसून मेहंदी लावून उत्पन्न मिळवतात, तर काही जण सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये मेहंदी कलाकार म्हणून काम करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेकजण स्वतःचे मेहंदी पेज तयार करून प्रसिद्धी आणि ग्राहक दोन्ही मिळवतात.
या क्षेत्रात तुम्ही मेहंदी शिकवण्याचे क्लासेस घेऊ शकता, ऑनलाईन कोर्सेस तयार करू शकता किंवा स्वतःचे ब्रँड तयार करून ऑरगॅनिक मेहंदी कोन विकू शकता. अनेक विदेशी देशांमध्येही हिना टॅटूची मागणी वाढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही ही कला आज संधी निर्माण करत आहे.
आज डिजिटल युगामुळे घरबसल्या युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुक अशा माध्यमांतूनही मेहंदी डिझायनिंगच्या क्लासेस घेता येतात. आपली कला जगापर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ ठरू शकते. त्यामुळे फक्त कौशल्य असून चालत नाही, त्याला योग्य प्रसिद्धी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मेहंदी ही केवळ सौंदर्य नव्हे तर एक प्रकारचा आत्मविश्वास आणि आनंद देणारे माध्यम आहे. ज्या हातांवर मेहंदीची सुंदर डिझाईन्स उमटतात, त्यांच्या चेहऱ्यावर हास्यदेखील खुलते. आणि त्या हास्यामागे असतो एक कलाकार जो आपल्या कौशल्याने इतरांच्या आनंदात सहभागी होतो. ही कला केवळ व्यवसाय न राहता, एक समाधानकारक अनुभव ठरतो.
- तृप्ती दत्तदीप गवस
सहाय्यक प्राध्यापिका