माणसाच्या आयुष्यात एखादा टर्निंग पॉईंट येतो, जेव्हा तो आपल्या वाईट सवयी सोडून एक नवा मार्ग स्वीकारतो. व्यसनाच्या गर्तेत सापडलेला माणूस जेव्हा स्वतःच्या इच्छाशक्तीने आणि योग्य प्रसंगाने सुधारतो, तेव्हा समाजाकडून त्याला मिळणारा आदर किती मोलाचा असतो, हे या सत्यकथेतून दिसते. एका 'वाल्या'चा 'वाल्मिकी' कसा होतो, याची ही हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कहाणी.
"वाल्याचा वाल्मिकी झाला" हा एक वाक्प्रचार मराठीत अगदी सर्रास वापरला जातो. एखादं टारगट पोरगं चांगले गुण मिळवतं, एखादा सडकछाप चांगल्या नोकरीला लागतो. त्यांना आम्ही म्हणतो "वाल्याचा वाल्मिकी झाला." थोडक्यात कुसंगती सोडून सुसंगतीत आला. वाल्मिकींनी रामायण लिहिले. इतिहासात आपल्याला जायचे नाही, पण वाल्मिकी ऋषींचं नाव अजरामर आहे असो!
बोलायला सगळे सोपे हो, पण खरंच व्यसनाच्या, सवयीच्या गर्तेत खोलवर गेलेला माणूस फक्त आपल्या स्वेच्छेने जागेवर येणे सोपे नाही. एक वेळेस समोर दिसल्यावर दार बंद करणारे आता पूजा करतात, मान देतात त्या माणसाला तुम्ही कधी पाहिलंय? मी पाहिलंय नव्हे अगदी जवळून पाहिलंय. त्याला, त्याच्या परिवाराला अगदी जवळून ओळखते मी.
तर, आमच्या समोरच्या चाळीत तळमजल्याला एक कुटुंब राहायचे. पन्नास वर्षे झाली आमचा अगदी घरोबा. कुटुंबप्रमुख अनिल भावे हेच आहेत आजच्या कथेचे नायक.
अनिल आत्माराम भावे. अस्सल कोकणस्थ, पूर्ण पुणेरी अगदी रोजच्या वागण्यातसुद्धा. अशा परिवारात अनिल भाऊंचा जन्म झाला. वडील भिक्षुक, दोन भाऊ, आई असा परिवार. पुण्यात सदाशिव पेठेत भाड्याच्या खोलीत राहत. अर्थात त्याकाळी सर्व भिक्षुक घरांप्रमाणे त्यांचीही प्रापंचिक स्थिती साधारणच. साहजिकच शालेय शिक्षणानंतर नोकरी धुंडाळणे हे आलेच. तसे शाळेतही अनिलभाऊ यथातथाच. बुद्धीने हुशार पण ती हुशारी बॅक बेंचर म्हणूनच ओळखली जायची.
"चुकला फकीर मशिदीत तसा नोकरी गरजू मुंबईत.” आले आमचे साहेब मुंबईत. एका मित्राच्या खोलीवर राहू लागले अनिलभाऊ. आता पोटपूजेसाठी काम शोधणे आलेच. भिक्षुकी जमत नव्हती आणि सरकारी नोकरी शक्यच नव्हती. साहजिकच छोटे-मोठे काम करून पोट भरणे चालू झाले. त्यात खोली होती कोळीवाड्यात, साहजिकच तिकडच्या पोरांशी ओळखी झाल्या. त्यात आमचे भावे... अस्सल पुणेरी! ग्रुप जमायला वेळ लागला नाही. आधी चहा, मग विडी, नंतर विकेंडला गावठी दारूपर्यंत.
अशातच मग ओळखीने एका मोठ्या कंपनीत जॉब मिळाला. पगार चांगला मग काय, कानात वारे शिरलेला घोडा कसा चौफेर उधळतो! अनिल भाऊंचे तसेच झाले. विकेंड करता करता रोज संध्याकाळ आणि मग सकाळ सुरू झाली दारू. सुरुवातीची मजा गरज होऊ लागली. इथे पुण्यात खबर पोहोचायला वेळ लागला नाही. वडिलांनी ताबडतोब हालचाल करून जातीतच एका गरीब परिवारातील मुलीशी लग्न लावून दिले. जेणेकरून मुलगा सुधारेल. पण कसलं काय! भाऊ पार पुढे पोहोचले होते व्यसनात. शेवटी चांगल्या वस्तीत आल्यावर तरी सुधारेल म्हणून भावाने खोली घेऊन दिली आमच्या येथे. पण काही फायदा नाही. सकाळपासून दारू चालू ती पार रात्रीपर्यंत. कामावर जाणे नाही फक्त पिऊन रस्त्यात गोंधळ इथपर्यंत मजल गेली होती भावेंची. आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत होतो पण करणार काय? बरे पत्नी तर इतकी साधी की भावे तिला असेच गुंडाळत.
होता होता दिवस सरले आणि भावेंच्या घरात पाळणा हलला. आता तरी सुधारेल... पण नाही. उलट मुलगी झाली ह्या आनंदात अजून जोरात व्यसन सुरू झाले. पैसे कमी पडू लागले, कर्जे वाढली, पगार अपुरा, चहू बाजूंनी संकटांनी घेरले होते पण भावे भाऊंना काय त्याचे, नशा चढली की राजा. मग सर्वांना सवय झाली तरी पत्नी आणि मुलीकडे पाहून वाईट वाटे पण करणार काय?
आणि तो दिवस उजाडला. दिवाळी होती, पण भावेंकडे मात्र अंधार, कारण गैरहजेरीमुळे भावे कंपनीतून सस्पेंड झाले. त्यातच मुलगी आजारी होती. ताप उतरत नव्हता. नेहमीप्रमाणे भावे भाऊ नशेत तर्र होते. परिस्थिती गंभीर झाली. शेवटी आम्ही मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले. ट्रिटमेंट चालू केली. एवढे सगळे झाले तरी भावेंना शुद्धच नव्हती आणि खबरही नव्हती. संध्याकाळी दारू उतरल्यावर पाहतात तर घरात कोणीही नाही. बराच वेळ शोधाशोध केली मुलीची, बायकोची पण कोणीही सांगेना. आता मात्र भावे घाबरले, पत्नीने काही बरे वाईट तर करून घेतले नाही ना? शंका-कुशंका भेडसावू लागल्या. व्यसनाधीन असला तरी एका चांगल्या परिवारातील माणूस, त्यात कुटुंबवत्सल. आम्ही पाहत होतो पण मुद्दाम सांगितले नाही. रडकुंडीला आले भावे, मग चाळीतील वयस्क वझे काकांनी खरड काढली त्यांची चांगली. शपथ घेतली भावेंनी दारू न पिण्याची. रात्रभर हा माणूस मुलीकडे हॉस्पिटलमध्ये थांबला. खरं सांगू, पूर्ण दारू उतरलेला अनिल भावे मी पहिल्यांदा पाहिला.
प्रथम सर्वांना त्यांची शपथ एक मस्करी वाटली. पण नाही, मिळालेल्या धड्यातून एक बोध घेतला भावेंनी. सुधारले, दारूच काय विडी, काडी, मित्र सगळेच बंद झाले. साहेबांची माफी मागून परत नोकरी मिळवली. एक अट्टल बेवडा हळूहळू माणसात येऊ लागला. सुधारणा पाहतच होतो आम्ही. त्यात वझे काकांचे सतत लक्ष. घरची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली, शिल्लक उरू लागली, कर्जे फिटली. मुलगीही आता शाळेत जाऊ लागली.
नियतीचा फेरा कसा असतो पहा. सहा महिन्यांपूर्वी भावे आले म्हटल्यावर दार लावणारे आता भावेंबरोबर गॅलरीत चहा पीत राजकारणाच्या गप्पा मारू लागले.
दिवस सरले, भूतकाळ विसरू लागले लोक. खरेच काळ हे औषध आहे पहा मानवी मनावर. मध्ये मी गेले होते गिरगावात आमच्या बाळा म्हात्रेच्या नातवाच्या लग्नाच्या पूजेला. घरात शिरले आणि पाहते तर काय? अहो आश्चर्यम्! चक्क भावे भाऊ आणि भटजी? बाळाही समजला. मग त्याने सांगितले भाऊ निवृत्त झाले आता. मग मोकळे बसण्यापेक्षा भिक्षुकी शिकले. आज गल्लीत काही कार्यक्रम असो, भटजी आमचे भावे भाऊ.
बोलता बोलता पूजा संपली. दक्षिणा द्यायची वेळ आली. बाळाने पाकीट दिले भावेंच्या हातात आणि उभयता पाया पडले हो भावेंच्या. खरेच भरून आले हो मला. वाल्याचा वाल्मिकी होतो हे परत एकदा सिद्ध झाले...
- रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.