मुलांचे वर्तन, त्यांची चिडचिड आणि वाढता ताण यामागे पालकांचा नकळत हातभार असतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात संवाद आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणारा एक चिंतनपर लेख.
सकाळचे साडेसहा वाजलेले. शाळेत जाण्यासाठी आई रोहनला उठवत होती. कितीतरी वेळा हाका मारल्या तरी रोहन उठेनाच! बऱ्याच वेळाने आईने जवळ येऊन त्याला हलवून जागे केले, तरी रोहनची झोप पूर्ण झाली नसल्याने त्याला जाग येईना. शेवटी सुरू झाली, ती आईची आरडाओरडा आणि चिडचिड! हा आवाज ऐकून रोहनचे बाबाही झोपेतून जागे झाले व त्यांचीही चिडचिड सुरू झाली. या सगळ्याचा रोहनवर काहीच परिणाम होईना! शेवटी कसेबसे जांभया देत, नाक मुरडत शाळेसाठी त्याला उठावे लागले. रोहनच्या घरातील सकाळ ही बऱ्याचशा घरांमध्ये आपल्याला बघायला मिळते.
अनिशची शाळा दुपारी एक ते सहा या वेळेत. रोजच अनिश सकाळी साडेनऊ ते साडेअकरा ट्यूशनला जातो. घरी येऊन जेवण करतो आणि मग थोड्या वेळाने तो शाळेला जातो. संध्याकाळी आल्यानंतर सात ते आठ हा त्याचा दैनंदिन क्रिकेट सरावाचा वेळ! त्यानंतरही वेळ उरतो म्हणून पालकांनी आपल्या मुलांमध्ये एखादी छंद-कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून त्याला आठ ते नऊ गायनाच्या क्लासला घातले आहे! या सर्व दिवसभराच्या वेळापत्रकात अनिश मात्र थकून जात आहे.
अशी अनेक उदाहरणे आपण पाहू शकतो. मुलांची असलेली सद्यस्थिती आणि या सगळ्याला आपण पालक खरंच कारणीभूत आहोत का? मुलांची वाढत असलेली चिडचिड, त्यांचा ढळत असलेला संयम याला आपण जबाबदार आहोत का? यावर चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक पालकांशी या ना त्या माध्यमातून संपर्क होत असतो. अनेक पालकांची आपल्या मुलांबाबत सतत तक्रार असते; आपल्या पाल्याची इतरांशी तुलना करणे, 'तुझ्यापेक्षा ते कसे श्रेष्ठ आहेत' हे सतत समजावून सांगणे, पाल्याकडून अवास्तव अपेक्षा करणे, आपल्या मुलाला समजून घेता न येणे, त्यांना पुरेसा वेळ देता न येणे, त्यांच्या गरजा लक्षात न घेणे, अशा सर्व कारणांमुळे मूल व पालक यांच्यामधील दरी वाढत चालली आहे.
वर दिलेल्या पहिल्या उदाहरणाचा नीट विचार केला तर, मुलांना रात्रीच लवकर झोपण्याची सवय लावली, तर ती मुले निश्चितच सकाळी लवकर उठू शकतात. उठण्यास तयार होऊ शकतात. त्यांची झोप पूर्ण झाल्यामुळे ते उठायला तक्रार करणार नाहीत. आणि त्याचा पालकांना त्रासही होणार नाही. त्यामुळे मुलांसाठी आणि एकंदर आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी रात्री लवकर झोपणे हितावह आहे, ती सवय पालकांनी मुलांना लावायला हवी.
दुसऱ्या उदाहरणाचा विचार केला तर, आजकाल बहुधा दोन्ही पालक हे नोकरी किंवा व्यवसाय करत असतात. त्यामुळे आपल्या मुलांना कुठेतरी व्यस्त ठेवले पाहिजे, त्यांना सतत कुठेतरी अडकवले पाहिजे ही मानसिकता आजकाल पालकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. ती चुकीची आहे असे नाही, पण या सगळ्यांमध्ये आपण 'मुलांना नक्की काय हवं आहे' याचा व्यवस्थित अभ्यास न करता आपल्या अपेक्षा मात्र त्यांच्यावर लादत चाललो आहोत. छंद आणि आवड जोपासण्यासाठी आठवड्यातील रिकाम्या रविवारचे नियोजन त्या दिवशी करू शकतो. रोज शाळा, ट्यूशन, मुलांचा वैयक्तिक अभ्यास या व्यतिरिक्त त्यांचा थोडा वेळ मैदानी खेळ खेळण्यात, मित्र-मैत्रिणींना भेटण्यात, एकमेकांना समजून घेण्यात, सामाजिक बांधिलकी शिकण्यात गेला पाहिजे!
आज मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे मुले कमी सामाजिक होत चालली आहेत. समाजामध्ये रुळणे, एकमेकांना सहाय्य करणे, वेळेला धावून जाणे हा भाग कमी होत चालला आहे. 'मोबाईल आणि त्याचा वापर' हा विषय तर विस्ताराने वेगळा लिहू शकू एवढी त्या विषयाची व्याप्ती आहे. अनेक मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, पालक घरात जसे वर्तन करतात, तशी त्यांची मुले घडत असतात. त्यामुळे पालकांनी दिवसभरात आपल्या वेळेचे नियोजन कसे करत आहोत, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना आपण योग्य तो मानसन्मान द्यायला हवा. त्यांच्याशी प्रेमाने, काळजीपूर्वक वागायला हवे. तरच आपली पुढची पिढी हे संस्कार आपल्याकडून शिकेल. सामाजिक बांधिलकी अंतर्गत एकमेकांना सहाय्य करणे, शेजाऱ्यांना मदत करणे, वेळप्रसंगी मदतीला धावून जाणे, इतरांचा विचार करणे या गोष्टी मुले पालकांच्या आचरणातून शिकत असतात.
शालेय शिक्षणाबरोबरच या गोष्टींचे संस्कार वेळेतच मुलांवर झाले तरच, त्यातून भावी योग्य पिढी घडणार आहे. फक्त अभ्यास आणि त्यातील प्रगती याकडेच प्रयत्न केंद्रित केले तर मुलांच्या स्वभावाच्या जडणघडणीत योग्य त्या वयात आपण महत्त्वाचे योगदान देण्यामध्ये कमी पडू शकतो. यासाठीच मुलांना समजायला लागते त्या वयापासून त्यांच्याशी प्रत्येक गोष्ट करण्यामागचे महत्त्व, त्याचे फायदे, इतरांवर प्रेम करणे, आधार देणे, सगळ्यांना सामावून घेणे या गोष्टींचेही महत्त्व मुलांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे.
वाचनाने माणूस प्रगल्भ बनतो. इतरांच्या अनुभवातून आपण बरेच काही शिकतो. म्हणून मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी आपण स्वतः आधी वाचनाला सुरुवात केली पाहिजे. वाचन केल्याने आपली शब्दसंपदा वाढते. आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार घडण्यासाठी आपणच पालकांनी प्रयत्न करायचे आहेत. त्यांना योग्य आणि पोषक वातावरण मिळेल याचीही काळजी आपणच घ्यायची असते. आपले मूल कोणाच्या संगतीत आहे, कुठल्या मुलांबरोबर त्याची मैत्री आहे याची जाण पालकांना निश्चित असावी. चला तर मग, आपली भावी पिढी आदर्श आणि सुसंस्कृत घडवूया आणि समाजाच्या प्रगतीत योगदान देऊया.