चकवा

रात्रीच्या भयाण अंधारात, अनोळखी रस्त्यांवरून प्रवास करताना अनेकदा गूढ आणि अनाकलनीय घटनांचा अनुभव येतो. गोव्याहून देवगडला निघालेल्या दोन मित्रांनाही एका मध्यरात्री अशाच एका 'चकव्या'चा अनुभव येतो, जो त्यांच्या मनात भीती आणि विस्मय निर्माण करतो. काय घडते त्यांच्यासोबत

Story: साद अदृश्याची |
18th July, 09:01 pm
चकवा

"अरे गाडी वळव! पुढे गव्यांचा कळप आहे!" नेहाल तन्वेशला ओरडत म्हणाला. नेहाल व तन्वेश हे दोन मित्र गोव्याहून देवगडला निघाले होते. विकेंड असल्यामुळे त्यांनी गेट-टुगेदरचा प्लॅन केला होता. देवगडला त्यांना रुद्र व करण हे पुण्यातील मित्र भेटणार होते. गोव्याहून संध्याकाळच्या दरम्यान तन्वेश व नेहालने गाडी सोडली होती. इकडतिकडच्या गप्पा करत नेहाल व तन्वेश चालले होते. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. तन्वेशने आता हॉटेलमध्ये थांबू व सकाळी जाऊ असे सुचवले. पण नेहाल ऐकेना. त्याला रुद्र व करणला भेटायची उत्सुकता होती, कारण ते संध्याकाळीच देवगडला पोहोचले होते. रस्ता वळणदार होता. मध्येमध्ये घनदाट झाडी होती. नेहाल गाडी खूप वेगाने चालवत होता.

सर्वप्रथम त्यांना अचानक एक मोठा साप रस्ता ओलांडताना दिसला. तन्वेशने नेहालला जरा हळू चालवण्याची सूचनाही केली. त्यानंतर दहा मिनिटांनी त्यांना खूप खेकडे रस्ता पार करताना दिसले. नेहाल ते पाहून थांबला व 'वाव' म्हणायला लागला, पण तन्वेशला हा प्रकार जरा वेगळा वाटला. तन्वेशने "आता मी चालवतो" असे म्हणून गाडी चालवायला सुरुवात केली. ते आता जवळ सत्तर किलोमीटर दूर होते. रस्त्याच्या कडेला दाट झाडे होती. रात्रीचे एक वाजले असावे. अचानक रस्त्यांच्या कडेला त्यांना लाकडांचा मोठा ढीग दिसला. जंगलातून जाणारा मार्ग असल्यामुळे त्यांचा नेटवर्क पण गेला होता. गुगल मॅप बंद पडला. कोणाला तरी रस्ता विचारू असा विचार त्यांच्या मनात येत होता.

एवढ्यात रस्त्याच्या कडेला नेहालला एक बाई कडेवर मूल घेऊन वाटेवर चालताना दिसली. नेहाल म्हणाला, "हिला विचारू रस्ता, थांब, ही इतक्या रात्री कुठे जाते देव जाणे!" पण तन्वेश म्हणाला, "गप्प रे, स्वप्नात आहेस का?" तन्वेश गाडी चालवत होता व त्याला कडेला बाई, मुलं वगैरे काही दिसले नव्हते. तन्वेशच्या डोक्यात मात्र शंकेची पाल चुकचुकली होती. पण नेहाल घाबरेल म्हणून तो गप्पच राहिला. ते गुगल मॅपच्या आधाराने चालले होते. नेटवर्क गेल्यामुळे त्यांचा रस्ता चुकला होता. एकवीस मीटर पुढे गेल्यावर त्यांना एक मोठी स्मशानभूमी दिसली. तन्वेश खूप घाबरला होता. काहीतरी आपल्याबरोबर वाईट घडते आहे असे त्याला वाटत होते. संथ गतीने गाडीचे चालणे चालूच होते. गाडी थांबायची नाही व उतरायचे नाही असे त्याने नेहालला सांगितले. परंतु, एकदा त्यांना भलामोठा साप दिसला. पुढे गेल्यावर खेकड्यांचा कळप, पुढे गेल्यावर तोच लाकडांचा ढीग. स्मशानभूमी आणि नेहालला ती बाई आपल्या मुलाला कडेवर घेतलेल्या त्याच ठिकाणी दिसत होती. असे वाटत होते ते त्याच रस्त्यावर गोल गोल फिरत आहेत. तीच झाडे, तोच साप अशी तीच तीच दृश्ये त्यांना परत परत दिसत होती. जणू वाटच सापडत नव्हती. एवढ्यात "गाडी वळव" असा नेहाल ओरडू लागला. गाडीपुढेच गव्यांचा एक मोठा कळप होता. तन्वेश घाबरला, पण पटकन गाडी वळवली व स्पीड घेतली. दोघांनाही आता आपल्याबरोबर चुकीचे घडत आहे हे कळले होते. अचानक तन्वेशला काय सुचले तो मोठ्याने हनुमान चालीसा म्हणू लागला. नेहालनेही त्याची साथ दिली व देवाकडे आपल्याला वाचवण्याचे सांगणे घातले.

थोड्याच वेळात "टेक अ लेफ्ट टर्न अँड कंटिन्यू फॉर थ्री किलोमीटर" असा आवाज आला. सकाळचे ३.३० वाजले होते. दोघांनाही जरा धीर आला. गुगल मॅपच्या आधारे त्यांना वाट सापडली होती. ते सकाळी सहाच्या सुमारास चहासाठी थांबले. चहाच्या टपरीवर मारुतीचेच चित्र होते व तो चहावाला नुकताच आला असावा. त्यांनी घडलेला प्रकार चहावाल्याला सांगितला. चहावाल्याने त्यांना "तुम्हाला रात्रीचा चकवा लागल्याचे सांगितले. देवाने तुम्हाला चकव्यातून वाचवले," असे म्हणत तो चहावाला देवाला अगरबत्ती लावून नमस्कार करू लागला.



- श्रुती नाईक परब