स्त्रियांमध्ये ऑटोइम्यून रोग होण्याची शक्यता जास्त का असते?

स्त्रियांमध्ये ऑटोइम्यून रोग विविध लक्षणांसह दिसू शकतात, ज्यामुळे त्यांचे निदान व उपचार करणे आव्हानात्मक होते. पण लक्षणे समजून घेणे आणि लवकर वैद्यकीय मदत घेणे प्रभावी व्यवस्थापन आणि जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते.

Story: आरोग्य |
18th July, 09:10 pm
स्त्रियांमध्ये ऑटोइम्यून रोग होण्याची शक्यता जास्त का असते?

ऑटोइम्यून रोग म्हणजे काय?

 ऑटोइम्यून रोग ही एक अशी आरोग्य स्थिती आहे ज्यामध्ये आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेचा समतोल बिघडतो व आपली रोगप्रतिकारक शक्ती चुकीने स्वत:च्याच चांगल्या पेशींना, ऊतींना आणि अवयवांवर दुश्मन समजून हल्ला करते. जगभरातील सुमारे ४-१०% लोक ऑटोइम्यून आजाराचा सामना करत असून, त्यापैकी जास्तीतजास्त रुग्ण (सुमारे ८०%) महिला आहेत.

शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेमध्ये टी-सेल्स, बी-सेल्स आणि ऑटोअँटीबॉडीज यांचा समावेश असतो, जे ऑटोइम्यून रोग आणि संसर्गापासून आपल्या शरीराचे संरक्षण करते. ऑटोइम्यून रोगांच्या वर्गवारीमध्ये दोन प्रकार असतात. पहिला, सिस्टेमिक म्हणजे संपूर्ण शरीरावर परिणाम करणारे जसे एस.एल.ई. आणि दुसरा ऑर्गन स्पेसिफीक म्हणजे विशिष्ट अवयवाशी निगडित उदा. हाशिमोटो थायरॉईडिटिस, टाईप १ मधुमेह. 

महिलांमध्ये ऑटोइम्यून रोगास पुढील गोष्टी कारणीभूत असतात. 

इस्ट्रोजेन, प्रोलॅक्टिन इत्यादी हार्मोन्स 

  इस्ट्रोजेन टी‑ सेल्स आणि बी‑सेल्सची क्रिया वाढवते, त्यामुळे रोगप्रतिकारक यंत्रणा अधिक जागृत होते.

गर्भधारणा, मासिक पाळी व रजोनिवृत्ती यासारख्या अवस्थेत हार्मोनल बदल आपल्या प्रतिकार क्षमतेवर प्रभाव करतात. यामुळे लूपस सारख्या आजारांमधील लक्षणे वाढू शकतात, तर रुमेटोईड संधिवात आणि मल्टिपल स्क्लेरोसिस यामध्ये लक्षणे कमी होऊ शकतात.   

X‑गुणसूत्राचा परिणाम

  स्त्रियांना दोन X‑गुणसूत्रे असल्याने, विशेष करून X‑इनअॅक्टीवेशन अपूर्ण किंवा विकृत झाल्यास रोगप्रतिकारक‑संबंधित जीन्सचे दुहेरी प्रमाण तयार होऊ शकते व रोगप्रतिकारक यंत्रणेचा परिणाम जास्त क्रियाशील होऊ शकतो. 

पर्यावरण आणि ट्रिगर्स

  ईप्सिन बार्र व्हायरस यांसारख्या विषाणूंमुळे लूपस व मल्टिपल स्क्लेरोसिसचे धोके वाढतात. हवा प्रदूषण लूपस होण्यास १३-२७% अधिक धोका निर्माण करते.

 सौंदर्यप्रसाधने, सलूनमधील कॉस्मेटिक्स सामान, तणाव, धूम्रपान, यु.वी. किरणे हे देखील ऑटोइम्यून रोगांचा धोका  वाढवतात.

नैसर्गिक शारीरिक प्रतिकारक्षमता

  स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक अँटीबॉडीज तयार करतात. यामुळे बी‑सेल्सचे अॅक्टीवेशन जास्त असते आणि ऑटोअँटीबॉडीजची पातळीही वाढते, जे ऑटोइम्यून रोगास कारणीभूत ठरू शकते.

महिलांच्या जीवनाच्या दर टप्प्यावर ऑटोइम्यून आजारांचा धोका असतो

किशोर अवस्थेत अचानक झालेल्या हार्मोनल वाढीमुळे ऑटोइम्यून आजार लवकर होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान इस्ट्रोजन- प्रोजेस्टेरोन होर्मोनच्या बदलांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते तीव्र किंवा कमी होऊ शकतात. जसे की ल्युपीसची लक्षणे वाढतात तर आर.ए.ची लक्षणे कमी होतात. गर्भधारणेनंतरच्या काळात हार्मोन कमी होताच आर.ए., एम.एस सारख्या आजारांचा फ्लेअर अप वाढतो. मॅनोपोज दरम्यान इस्ट्रोजन कमी झाल्याने काही आजारामध्ये सुरुवातीलाच धोका कमी झाला असला तरी नंतर धोका उद्भवतो.

ऑटोइम्यून रोगांचे व्यवस्थापन

ऑटोइम्यून रोगांचे व्यवस्थापन करणे, हे दर आजाराप्रमाणे बदलू शकते. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे. जीवनशैलीतील बदल आणि नियमित तपासण्या, आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. 

ऑटोइम्यून रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खालील गोष्टी केल्या जातात

जीवनशैलीतील बदल:

 आहार: संतुलित आणि पोषक आहार घेणे, जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे. 

 व्यायाम: नियमित हलका व्यायाम करणे, ज्यामुळे शरीराची कार्यक्षमता सुधारते. 

 पुरेशी झोप: रात्री ७-८ तास झोप घेणे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. 

 तणाव व्यवस्थापन: योगा, ध्यान किंवा इतर विश्रांती तंत्रांचा वापर करून तणाव कमी करणे. 

औषधे: 

दाह कमी करण्यासाठी कॉर्टिकोस्टेरॉईड्स आणि नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्ससारखी औषधे दिली जातात. रोगप्रतिकार शक्ती कमी करण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. विशिष्ट अवयवांवर परिणाम झाल्यास त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठीही औषधे दिली जातात. 

थेरपी:

स्नायू आणि सांध्यांची ताकद वाढवण्यासाठी शारीरिक उपचार व फिजीओथेरपी उपयोगी ठरते. दैनंदिन कामे व्यवस्थित करण्यासाठी व्यावसायिक उपचार म्हणजे ऑक्यूपेशनल थेरेपी उपयुक्त ठरते. 

स्त्रियांमध्ये ऑटोइम्यून रोग विविध लक्षणांसह दिसू शकतात, ज्यामुळे त्यांचे निदान व उपचार करणे आव्हानात्मक होते. पण लक्षणे समजून घेणे आणि लवकर वैद्यकीय मदत घेणे प्रभावी व्यवस्थापन आणि जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते.


- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर