आज गोव्यातील कित्येक तरुण कवी, लेखक आवर्जून उल्लेख करतात काव्यमैफिलीचा. अशोक सरांनी लावलेल्या रोपट्याचा आता त्यांच्या पश्चात वटवृक्ष होऊ घातलाय आणि त्याला खतपाणी घालताहेत कविता ताई.
प्रा.कविता अशोक बोरकर एक मानसशास्त्र विशारद, लेखिका, कवयित्री आणि गोव्यातील एका मोठ्या उद्योग समूहाशी निगडित व्यक्तिमत्त्व. गेले कित्येक दिवस मी ठरवत होते की, माझ्या 'व्यक्ती एक व्यक्ती' सदरात कविता ताईंना समाविष्ट करावे. पण म्हणतात ना, योग यावा लागतो. तो आला काव्यमैफिलीच्या विसाव्या वर्धापन दिनामुळे.
कविता ताईंचा आणि माझा परिचय होणे हा माझ्या आयुष्यातला एक माईलस्टोनच म्हणा ना! माझी मैत्रीण वर्षा ही अशोक बोरकर काव्यमैफिल संस्थेची सदस्या. एक दिवस मला ती घेऊन गेली तिथे. गोव्यात आल्यावर काही वर्षे नोकरी करून मग मी ती सोडली; त्यामुळे माझ्याकडे दिवसभर भरपूर वेळ असे. अर्थात कविता, साहित्याची खूप आवड होती. म्हटले, चला जाऊन तर येऊ वर्षाबरोबर. आणि पोहोचले मंथनगडावर, आणि काय सांगू, अगदी गडवासीच झाले मी त्या दिवसापासून.
वर्षाने ओळख करून दिली सर्वांशी. गप्पा चालू होत्या सर्वांच्या आणि एवढ्यात एक एन्ट्री झाली. गौरवर्ण, अस्सल ब्राह्मणी चेहरा, एकंदरीत साठीकडे झुकलेले एक अधिकारी व्यक्तिमत्त्व. सगळ्यांशी हसतखेळत आणि सहज वागणूक. त्यात मी नवीनच. थोड्या वेळाने त्यांची नजर गेली माझ्याकडे. गोड हसल्या. कोणीतरी ओळख करून दिली, "ह्या कविता ताई, कविता बोरकर काव्यमैफिलीच्या संस्थापिका." झाले, त्या दिवसापासून ताईंचे आणि माझे ऋणानुबंध जुळले ते आत्तापर्यंत.
कविता ताई ह्या पूर्वाश्रमीच्या शुभदा पराडकर. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात जन्मलेल्या, वाढलेल्या ताई, कलेचे माहेरघर असलेल्या गोव्यात आल्या त्या बोरकर घराण्याची सून म्हणून. सुधारक परिवारातील ताई स्वतः मानसशास्त्राच्या द्विपदवीधर. बालमानसशास्त्र हा त्यांचा आवडता विषय. कोणालाही झटकन आपलेसे करून घेण्याचा त्यांचा स्वभाव पाहता, मानसशास्त्र हे त्यांच्या नसानसात भिनलेले आहे याची खात्रीच पटते.असो!
आजोबा धरणीधर शास्त्री हे प्रख्यात कीर्तनकार होते. त्यांची स्वतःची वेद पाठशाळाही होती. साहजिकच अध्यात्माची गोडी त्यांना तिथेच लागली. त्यांचे पिता शशिकांतरावही अध्यात्माचे पाईक होते. घरात तसे कलेचे वातावरण, भावंडे गायन, चित्रकलेत प्रवीण. एकत्र परिवारात राहिल्यामुळे समृद्ध, सात्त्विक वातावरणात बालपण गेले त्यांचे.
आणि अशा ह्या पुणेरी काळ्या मातीतून गोव्याच्या लाल मातीत लग्न करून आल्या ताई. सासरचे सगळे व्यावसायिक मोठे गोव्यात. बांधकाम, पॅकेजिंग, सुपर मार्केट अशा अनेक व्यवसायात दबदबा. पण ताई सर्वार्थाने वेगळ्या. एवढे सगळे असल्यावर एखादी स्त्री राहिली असती आरामात नवऱ्याच्या जीवावर. पण नाही. ताईंनी आपल्या आवडत्या क्षेत्रात नोकरी पत्करली आणि आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवले. मडगावच्या प्रसिद्ध चौगुले कॉलेजमध्ये व नंतर गोवा विद्यापीठात त्यांनी आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा भरपूर उपयोग करून दिला विद्यार्थ्यांना. आवडत्या क्षेत्रात कार्यरत असल्या तरी मनात कुठेतरी दडलेली कवयित्री हळूच डोके वर काढत होतीच. बालपणात, तरुणपणात तशा कविता लिहिल्या होत्याच, पण नंतर तशी प्रगती नव्हती. पण दैवाची लीला पहा, आयुष्यभराची साथ मिळाली ती एका कवीमनाच्या माणसाची. श्री अशोक बोरकर स्वतः छान कविता रचत. त्यांचे काव्यसंग्रहही आहेत. त्यांच्या प्रोत्साहनाने ताईंच्या मनातील कवितेची ऊर्मी परत जागृत झाली. आणि त्यात भर पडली ती काव्यमैफिलीची. सन २००५ साली पाया घातला अशोक सरांनी काव्यमैफिलीचा. समाजातील सर्व थरातील कवी, लेखकांना मुक्त व्यासपीठ मिळाले कला सादरीकरणाचे. त्यात बोरकर दाम्पत्याचा आशीर्वाद, मग काय पाहायलाच नको. आज गोव्यातील कित्येक तरुण कवी, लेखक आवर्जून उल्लेख करतात काव्यमैफिलीचा. अशोक सरांनी लावलेल्या रोपट्याचा आता त्यांच्या पश्चात वटवृक्ष होऊ घातलाय आणि त्याला खतपाणी घालताहेत कविता ताई. अतिशय सकारात्मक विचारांच्या ताई कोणतेही कार्य हातात घेतले, तर ते तडीस नेणाऱ्याच. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात एक जादू आहे खरी. त्यांची एक खासियत म्हणजे निखळ दाद देणे. भरभरून कौतुक करतात हो त्या. कोणाच्याही अंगावर नक्कीच मूठभर मांस चढेल. वीस वर्षे झाली त्या हा वसा पुढे नेत आहेत. अर्थात आता काव्यमैफिलीचा प्रपंचही वाढलाय आणि सांभाळणारे हातही भरपूर आहेत. त्यामुळेच गेली वीस वर्षे हा यज्ञ अव्याहत चालू आहे. खरेच ताई तुम्हाला एकच पदवी ‘सर्वेसर्वा!’ सगळ्यांकडे आनंद पसरवणाऱ्या आणि स्वतः सतत आनंदी राहणाऱ्या माझ्या गुरुतुल्य कविता ताईंना शतशः नमन!
- सौ. रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.