केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लॉटरी खरेदीसाठी लोकांची अलोट गर्दी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लॉटरी खरेदीसाठी लोकांची अलोट गर्दी

पणजी : केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘महाप्रसाद पावती २०२५’ लकी ड्रॉला यंदाही प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. शनिवारी पहाटे लॉटरी विक्रीस प्रारंभ होताच हजारो लोकांनी केपेतील क्रीडा संकुलापासून तिळामळ जंक्शनपर्यंत सुमारे दोन किलोमीटर लांब रांग लावली होती. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही बक्षीस स्वरूपात आकर्षक आलिशान कारगाड्या ठेवण्यात आल्या असून, त्यामुळे राज्यभर तसेच शेजारील राज्यांतील लोक लॉटरी कूपनसाठी केपेकडे आकर्षित होत आहेत. हातोहात कूपन विक्री होत असल्यामुळे पहाटेपासूनच लॉटरी मिळविण्यासाठी मोठी झुंबड उडाल्याचे चित्र होते.



यंदा लकी ड्रॉसाठी सुमारे दीड लाख कूपन छापण्यात आली आहेत. या माध्यमातून मिळणारा निधी धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांवर खर्च केला जातो. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीही याच निधीतून दिली जाते. केपे पोलिस व वाहतूक विभागाने योग्य नियोजन करून गर्दीवर नियंत्रण ठेवले. कुठलाही अनुचित प्रकार घडू देता संपूर्ण विक्री प्रक्रिया शांततेत पार पडत आहे.

The Goan EveryDay: Jackpots at donation coupons attract huge interest in  Quepem, Sanguem


यंदाच्या लकी ड्रॉतील प्रमुख आकर्षण म्हणजे २० आलिशान कार व एसयूव्ही. त्यामध्ये BMW 5 सिरीज, ऑडी Q3, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, महिंद्रा थार ROXX, किआ सेल्टॉस, ह्युंदाई क्रेटा, ग्रँड विटारा, टाटा कर्व्ह, एमजी विंडसर EV, महिंद्रा BE 6 यांचा समावेश आहे. याशिवाय मारुती फ्रॉन्क्स, स्कोडा कुसाक, किआ सॉनेट, टाटा नेक्सॉन, डिजायर, ब्रेझा, वेन्यू, अ‍ॅमेझ यांसारख्या गाड्याही बक्षीस रूपात जाहीर करण्यात आल्या आहेत.


केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९८८ मध्ये झाली तर २००२ मध्ये त्याची अधिकृत नोंदणी करण्यात आली. मंडळ गणेशोत्सव काळात धार्मिक कार्यक्रम, संगीत नाटके, विद्यार्थ्यांचा गौरव, शिष्यवृत्ती वाटप आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करते. मागील वर्षीही मंडळाने टोयोटा फॉर्च्युनर, महिंद्रा XUV700, जीप कंपास, टाटा सफारी व अनेक दुचाकी गाड्या बक्षीस म्हणून दिल्या होत्या. त्यामुळे ‘महाप्रसाद पावती’ लॉटरी दक्षिण गोव्यातील सर्वात लोकप्रिय उपक्रमांपैकी एक बनली आहे.