पणजी : गोव्यातील तरुणाई शेतीकडे वळावी आणि कृषी क्षेत्रात नवकल्पना रुजाव्यात यासाठी गोवा सरकारने माध्यमिक शाळांमध्ये शेती हा विषय सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अभ्यास सहली सक्तीच्या असून, प्रत्यक्ष अनुभवातून शेतीचे शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना लहान वयातच शेतीविषयक ज्ञान मिळावे आणि कृषी क्षेत्रात आवड निर्माण व्हावी, हा यामागचा उद्देश आहे.
याशिवाय, सरकार कृषी-क्लिनिकची संकल्पना राबवण्यावरही भर देत असून, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी ही केंद्रे कार्यरत राहणार आहेत. राज्यात एक कृषी-क्लिनिक सुरू झाले असून, आणखी काही सुरू होण्याच्या प्रक्रियेत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या योजनेंतर्गत कृषी पदवीधरांना स्वतःचे कृषी-क्लिनिक सुरू करण्यासाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आधुनिक शेतीला चालना मिळेल, स्वयंरोजगाराचे नवीन मार्ग निर्माण होऊन शेती हा तरुणांसाठी आकर्षक व फायदेशीर व्यवसाय ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.