घेतली सभापतींच्या हौदात धाव; गोंधळ वाढल्याने सभापतींनी विधानसभेचे कामकाज दहा मिनिटांसाठी केले स्थगित
पणजी : गोव्यातील कोळशाच्या वाहतुकीवर आकारण्यात येणाऱ्या ग्रीन सेसच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. 'आमका कोळसो नाका' अशा घोषणा देत विरोधकांनी सभापतींच्या हौदात धाव घेतली. परिणामी सभापतींनी विधानसभेचे कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुरगाव बंदरातून होणाऱ्या कोळसा हाताळणीबाबत सरकारला घेरले. त्यांनी आरोप केला की, जिंदाल कंपनीने २०१३ साली ५ मिलियन मेट्रिक टन कोळसा हाताळणीसाठी पर्यावरण परवानगी घेतली होती. मात्र, २०१५-१६ मध्ये ही मर्यादा उल्लंघून १० मिलियन टन कोळसा हाताळण्यात आला. पर्यावरण परवानग्यांचे हे उल्लंघन असून गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही आलेमाव यांनी केला.
पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनीही या उल्लंघनाची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा सरकार विचार करत असून, संबंधित फाईल ॲडव्होकेट जनरलकडे पाठवण्यात आली आहे. मात्र, या उत्तरावर आलेमाव संतप्त झाले. फक्त सल्ल्याकरिता फाईल पाठवली गेली असून, कोट्यवधी रुपयांची महसुली नुकसान झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.
यावर मुख्यमंत्री आणि आलेमाव यांच्यात वाद वाढल्याने सभागृहाचे वातावरण तापले. शेवटी विरोधकांनी सामूहिकरित्या सभापतींच्या हौदात जाऊन 'आमका कोळसो नाका' अशा घोषणा दिल्या. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केले.