सरकारकडून हेक्टरमागे मिळते २ लाखांचे अनुदान : मुख्यमंत्री
पणजी : गोव्यात मानकुराद आंब्याच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी नव्या कलमांची लागवड गरजेची असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडले आहे. सरकारकडून मानकुराद आंब्याच्या लागवडीसाठी हेक्टरमागे २ लाख इतके अनुदान दिले जाते व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी विधानसभेत केले.
साळगावचे आमदार केदार नाईक यांनी विधानसभेत मानकुराद आंब्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हापूसच्या तुलनेत मानकुरादाची चव अधिक दर्जेदार आहे. आजवर आपण फक्त जुन्या झाडांवरील आंबेच खाल्ले आहेत. मात्र आता नवी लागवड सुरू करणे आवश्यक आहे.
कृषी मंत्री रवी नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले की, खात्या तर्फे आंबे आणि माडांच्या कलमांचे वितरण केले जाते. तसेच मानकुराद आंब्याची रोपे लावणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक रोपासाठी ६०० रुपयांचे अनुदान दिले जाते. गोव्यातील मानकुराद आंब्याला देशविदेशातून मोठी मागणी असून, शेतकऱ्यांनी यामध्ये असलेली संधी ओळखावी व त्यांचे चीज करावे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मानकुराद आंब्याच्या जीआय टॅगसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच हा प्रश्न तडीस लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.