गोव्यातील वारकऱ्यांसाठी पंढरपुरात 'वारकरी भवन'

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st August, 05:01 pm
गोव्यातील वारकऱ्यांसाठी पंढरपुरात 'वारकरी भवन'

पणजी : गोव्यातून पंढरपूरला पदयात्रा करणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकार महत्त्वाची योजना आणणार असून, पंढरपूर येथे गोवा सरकारकडून 'वारकरी भवन' उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केली.

पंढरपूरच्या वारीसाठी दरवर्षी गोव्यातून सुमारे ५ हजार वारकरी ३७० किमीची पायी यात्रा करतात. या पार्श्वभूमीवर आमदार प्रेमेंद्र शेट यांनी विधानसभेत वारकऱ्यांसाठी खासगी विधेयक मांडले होते. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यात वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी योजनांची गरज आहे. मागील वर्षी एक योजना प्रस्तावित होती, ती काही कारणांनी राबवली गेली नाही. मात्र, पुढील वारीपूर्वी वारकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची नवीन योजना आणण्यात येईल.

ही योजना कला आणि संस्कृती विभाग किंवा समाजकल्याण खात्यामार्फत राबवण्यात येणार असून, वारीच्या दोन महिने आधी अर्ज करून पात्र वारकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. मात्र, त्या निधीच्या वापराचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, योजनेसाठी संस्थांची नोंदणी, लाभार्थींची संख्या आणि इतर अटी निश्चित करण्यात येतील. तसेच, पंढरपूर किंवा त्याच्या आसपास गोवा सरकारचे 'वारकरी भवन' उभारण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा उपलब्ध करून देण्याची लेखी विनंती करण्यात आली आहे. यामुळे गोव्यातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. समाजात भक्ती, सद्भावना, संस्कृती वाढणे, नवीन पिढी याकडे आकर्षित होणे ही चांगली गोष्ट आहे.

हेही वाचा