अनिता थोरात यांची दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st August, 01:25 pm
अनिता थोरात यांची दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी भाजपच्या अनिता थोरात यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या पदासाठी थोरात यांचा एकमेव अर्ज शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल झाला. त्यामुळे त्यांची निवड होणे निश्चित झाले आहे. संजना संजय वेळीप यांनी १४ जुलै रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत थोरात यांच्या नावावर एकमताने सहमती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी अधिकृतरीत्या अर्ज सादर केला.

यापूर्वी, सुवर्णा तेंडुलकर यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये गिर्दोली मतदारसंघाच्या सदस्य संजना वेळीप या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. मात्र, केवळ दहा महिन्यांत पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

४ ऑगस्ट रोजी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभा घेण्याचे आदेश पंचायत संचालक सिध्दी हळर्णकर यांनी दिले आहेत. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी फ्लोरिना कुलासो या निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. अनिता थोरात यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला आहे. त्याचा केवळ एकच अर्ज विहित कालावधीत आलेला असल्याने त्यांची निवड निश्चित झालेली आहे