पणजी : जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित खगोलशास्त्रीय संस्था असलेल्या व्हॅटिकन वेधशाळेच्या संचालकपदी गोमंतकीय जेझुईट फादर रिचर्ड डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोप लिओ xiv यांनी ही ऐतिहासिक नियुक्ती जाहीर केली.
फादर डिसोझा वयाच्या ४७व्या वर्षी या पदावर विराजमान होत असून, त्यांनी खगोलशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. २०१६ पासून ते व्हॅटिकन वेधशाळेत कार्यरत आहेत. ही नियुक्ती गोवा तसेच जागतिक जेझुईट समुदायासाठी अभिमानाचा क्षण ठरली आहे. कित्येक शतकांपासून विज्ञान आणि श्रद्धेतील समन्वय साधणाऱ्या या वेधशाळेच्या माध्यमातून फादर डिसोझा विज्ञानावर आधारित संवाद पुढे नेण्याचे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.