जाणून घ्या आजच्या कामकाजातील ठळक घडामोडी
पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात होत आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेसह खात्यांच्या मागण्यांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे. अधिवेशनासाठी ७८९ तारांकित तर ३,३३० अतारांकित प्रश्न आले आहेत. लॉटरी पद्धतीने प्रश्न चर्चेला येतील. याशिवाय शून्यप्रहर, लक्षवेधी सूचना असतील.
आज शुक्रवार १ ऑगस्ट रोजी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या दहाव्या दिवशी पहिल्या सत्रात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. कृषी खात्याशी निगडीत प्रश्नांची उत्तरे यावेळी सदर करण्यात आली. नंतर कोळसा वाहतुकीवर सेस आकारणीच्या मुद्द्यावर विरोधक आमने-सामने आले. गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
पहा आजच्या ठळक घडामोडी; थोडक्यात. (अपडेट साठी पेज रिफ्रेश करा)
दुपारी : ३.०५ : यापुढे कोणताही रस्ता खणण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेणे आवश्यक. विनापरवाना रस्ता खोदल्यास कंत्राटदाराला दंड. मुख्य रस्ते बांधण्यापूर्वी सर्व वाहिन्या घालणे आवश्यक करण्यात येईल. वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
दुपारी : १.२० : किनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी अभ्यास करून याबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवला जाईल. किनाऱ्यावर कसलीही परवानगी देताना नियमांचे कडक पालन करण्याची सूचना सीझेडएमपी व अन्य खात्यांना देण्यात येईल : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
दुपारी : १२.४० : 'माडाचे गॉड' तयार करणाऱ्या व्यवसायिकांना सरकारी मदत तसेच जीआय टॅगिंग करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आमदार जीत आरोलकर यांनी विधानसभेत केली. या मागणीबाबत सरकार विचार करणार असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.
दुपारी १२.२५ : कोळशावरील ग्रीन सेस वसुलीवरून विरोधक आक्रमक; 'आमका कोळसो नाका' अशा घोषणा देत विरोधक हौदात. सभापतींनी विधानसभेचे कामकाज दहा मिनिटांसाठी केले स्थगित.
दुपारी १२.०५ : विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील लागवडीखालील जमीन वाढवल्यास, माझ्या स्वतःच्या पैशातून अनुक्रमे १ लाख, ५० हजार आणि २५ हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील : रवी नाईक, कृषी मंत्री.
सकाळी : ११.४० : मानकुराद कलमाच्या लागवडीसाठी सरकार १ हेक्टरमागे २ लाखांचे अनुदान देते. मानकुराद आंब्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी नव्या रोपांची लागवड आवश्यक. मानकुरादच्या जीआय टॅग संदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात : डॉ प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.