शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा यासाठी प्रयत्नांची गरज : आमदार आलेक्स रेजिनाल्ड

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे अत्यावश्यक, जेणेकरून पुढील पिढी शेतीकडे वळेल.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st August, 03:26 pm
शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा यासाठी प्रयत्नांची गरज : आमदार आलेक्स रेजिनाल्ड

पणजी : पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या १० व्या दिवशी सकाळच्या सत्रात, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यात सभागृहाच्या पटलावर शेती आणि शेतीच्या इतर बाबींवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी शेतीकडे वळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे; मात्र सध्याच्या पालक व विद्यार्थ्यांची मानसिकता शेतीकडे वळण्याची नसल्याची खंत आमदार रेजिनाल्ड यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, शेतीचे क्षेत्र वाढावे आणि उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांना शेतीत उतरवण्याचा उद्देश सरकारचा आहे. त्यासाठी ८ वी ते १० वीच्या अभ्यासक्रमात शेतीविषयक माहिती देण्यासाठी अभ्यास सहलींचे आयोजन केले जात आहे. तसेच, ११ वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी शेतीविषयक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, रेजिनाल्ड म्हणाले की, आजचे पालक आपल्या मुलांना शेतीकडे वळण्यास प्रवृत्त करत नाहीत. तसेच मुलांची मानसिकताही घरातून बाहेर पडून शेती करण्याची नाही. त्यामुळे आजच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे अत्यावश्यक आहे, म्हणजेच पुढील पिढी शेतीकडे वळेल. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाच्या योजनांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव लवकरच वित्त विभागाकडे पाठवला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.