म्हापसा : बार्देश तालुक्यातील खोर्जुवे येथील हजारो चौ. मी. जमीन बनावट मृत्यूपत्र व बोगस कागदपत्रांच्या आधारे हडपल्याच्या प्रकरणात म्हापसा पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. देविदास गोपीनाथ पणजीकर आणि वामन श्रीधर पोळे अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज अतिरीक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी २८ जुलै रोजी फेटाळला होता. त्यानंतर पोलिसांनी ३१ जुलै रोजी त्यांना अटक केली. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अनंत नारायण कामत यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांनी मालमत्तेवर दावा केला होता. मात्र, आरोपींनी बनावट मृत्यूपत्र आणि कागदपत्रांच्या आधारे सर्वे क्र. ५२/०, ५१/३, ५०/७, १००/७, १००/१, ५३/८, ५८/८, ५५/९, २८/१(पार्ट), १४०/१ (पार्ट) मधील जमिनीचे म्युटेशन करून ती बळकावली होती.
हे बनावट मृत्यूपत्र मुंबईतील नोटरी संशयित आर.बी. गुप्ता व अॅड. पी. के पाठक यांच्या संगनमताने संशयितांनी मुंबईत तयार केल्याचे आढळून आल्याने वरील नोटरी व वकिलाची या प्रकरणात चौकशी करण्यात यावी, असे फिर्यादींनी तक्रारीत नमुद केले होते. या प्रकरणात सुहासिनी पडवळ, प्रकाश म्हांबरे, विशांत कामत, रामजी गुप्ता, प्रदीप पाठक यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. मार्च २०२५ मध्ये या संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास म्हापसा पोलीस करीत आहेत.