चकहो... तुम्हाला आठवतंय का? लहानपणी जेव्हा लाईट जायची, तेव्हा आपण घाबरून मोठ्यांना बिलगून बसायचो. तो काळोख आपल्याला खूप भयावह वाटायचा. अंधार पडला की भूत येतील या भीतीने आपण त्या अंधाराकडे नीट बघतही नव्हतो. पण आता जेव्हा आपण मोठे झालो आहोत, तेव्हा कुठेतरी हाच काळोख आपल्या त्रासदायक विचारांना आणि वेदनेला अधिक गडद करत असतो.
हे कसं, असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. आता झोपेपूर्वी पलंगावर पडलेल्या स्वतःला नजरेसमोर आणा आणि रात्र झाल्यावर झोपी जाण्यापूर्वी जेव्हा तुम्ही लाईट बंद करता, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःसोबत असता. बालपणातील त्याच भयावह अंधारात बालिश मनाला भेडसावणारा हाच काळोख यौवन मनाला एक गूढ तीर्थ पाजतो. चौफेर पसरलेला काळोख आणि याच काळोखातून आत्म्याच्या लख्ख प्रकाशाने आपले धगधगते अस्तित्व काळोखात अगदी डोळसपणे दिसू लागते.
होय, मी याच काळोखाबद्दल बोलत आहे. मानवी मनाला क्षणभंगुराचे सुख चाखवणारा हाच आहे तो काळोख. बाहेरच्या जगातून थकून जेव्हा शरीर पलंगावर पडते आणि आत्म्यासाठी सुखाची मागणी करते, तेव्हा मानवाला या काळोखात शिरायला भाग पाडते.
काळोखात शिरणे म्हणजे काळोखात कुढत बसणे अजिबात नाही बरं का! आजच्या तंत्रयुगात जर एखादा माणूस गपचूप एकटा जरी बसला असेल, तर लोक त्याला चिंतित समजतात आणि जर तोच माणूस बाहेरील जगात मग्न होऊन स्वतःला हरवून घेतो, तर त्याला सर्वसाधारण
मानले जाते.
फरक फक्त एवढा असतो की, काळोखात कुढत बसलेल्या माणसाच्या मनात देखील काळोखच पसरलेला असतो. याच काळोखात तो दिशाहीन भटकत असतो आणि इतरांनाही आपल्या आतील काळोखाचाच अंधार देत जगत असतो. परंतु जो माणूस स्वतःला नव्याने शोधायला काळोखात एकाकी शिरतो, तेव्हा हाच काळोख त्याच्या अंतर्मनाला प्रज्वलित करून टाकतो. काळोखातून तो आपली यातना, चिंता व दैनंदिन जीवनाची चिडचिड या नैराश्याकडे वळणाऱ्या सर्व भावना काळोखात वाहून टाकतो आणि बाहेरील जगाला केवळ काजवे प्रदान
करतो.
रात्री पृथ्वीवर कितीही काळोख जरी पडला असला, तरी आसमंत देखील चांदणे गाठून स्वतःचा प्रकाश शोधून काढतो. आपण तर याच आकाशाखालचे मानवी जीव आहोत.
आपल्याकडे स्वतःला ओळखण्याची हौस आहे. स्वतःला स्वतःहून जागे करण्याचे सामर्थ्य आहे. स्वतःला समुपदेशन देऊन स्वतःला आनंदी बनवण्याची कला आपल्यामध्ये आहे. एवढे सामर्थ्य जर या भूतलावरच्या प्रत्येक मानवाला आले ना, तर या तंत्रयुगातल्या मानवी मनातील काळोख कायम संपेल आणि मानवी जगात व मानवी मनात नवचैतन्याचे, मांगल्याचे व परिवर्तनाचे धगधगते दिनकर उगवेल.
- रुबिना हसीना शेख
पिळगाव-डिचोली.