मडगाव : रुमडामळ- दवर्लीतील बेकायदा बांधकामप्रकरणात रुमडामळ- दवर्ली पंचायतीच्या चार पंचांना सासष्टीचे गटविकास अधिकारी आदर्श देशमुख यांनी अपात्र ठरवले होते. दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिलेली आहे. आझाद फनीबंद यांच्या बेकायदा बांधकामाची मुकेश नाईक यांनी तक्रार केली होती. त्यानंतर या चार पंचांनी या आदेशाविरुद्ध दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात स्थगितीसाठी अर्ज सादर केला होता. त्यावर शनिवारी सुनावणी झाली.
नेमके प्रकरण काय ?
उसगाव फोंडा येथील मुकेश नाईक यांनी १५ जानेवारी २०१४ रोजी रुमडामळ- दवर्ली पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामाची तक्रार पंचायतीकडे केली होती. ही तक्रार आझाद फणीबंद यांच्या बांधकामांबाबत होती. यानंतर १८ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेत हा विषय चर्चेला आला असता तत्कालीन सरपंच मुबिना बी फनीबंद, मोहम्मद सैमुल्ला फनीबंद, मोहम्मद मुस्तफा दोड्डमनी व झुबेदा अगसर हे उपस्थित होते. त्यांनीही या विषयावर चर्चेत सहभाग घेतला होता.
आझाद फनीबंद हे सैमुल्ला यांचे वडील, मुबिना यांचे सासरे होत. पंचायतीत कार्यरत पंच हे आझाद फनीबंद यांचे नातेवाईक असल्याने बेकायदा बांधकामावर कारवाई झाली नाही अशी तक्रार मुकेश नाईक यांनी सासष्टीचे गटविकास अधिकारी आदर्श देसाई यांच्याकडे केली होती. त्यावर सुनावणी होऊन माजी सरपंच मुबिना बी फनीबंद, सैमुल्ला फनीबंद, मोहम्मद मुस्तफा दोडमनी व झुबेदा अगसर यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्यांना पंच म्हणून पंचायतीचे कोणतेही काम करता येणार नव्हते.
सरपंच व उपसरपंच यांनी राजीनामे दिल्यापासून मागील दोन महिने रुमडामळ पंचायतीवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. आता सोमवारी सरपंचपदाची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर चारही पंचांनी बीडीओच्या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सदर आदेशाला स्थगिती दिलेली आहे.