सिंधुदुर्ग : कोकणातील ग्रामीण जीवनशैलीला सोशल मीडियावर जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या लोकप्रिय ‘रेड सॉईल स्टोरीज’ या युट्यूब चॅनेलचे निर्माते शिरीष गवस (वय ३३) यांचे मेंदूशी संबंधित आजारामुळे नुकतेच दु:खद निधन झाले. काही दिवसांपासून ते गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.
कोरोनाकाळात नोकरी गमावलेल्या शिरीष आणि पत्नी पूजा गवस यांनी सिंधुदुर्गातील त्यांच्या मूळ गाव सासोली (दोडामार्ग) येथे स्थलांतर करून ‘रेड सॉईल स्टोरीज’ या चॅनेलला सुरुवात केली होती. पारंपरिक कोकणी रेसिपीज, गावातील जीवनशैली, लोककथा आणि कृषी जीवनाचा आशय मांडणाऱ्या त्यांच्या व्हिडिओंना जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सध्या या चॅनेलचे ४.२७ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
शिरीष यांचे वडील निवृत्त नायब तहसीलदार आहेत. शिरीष यांनी एमबीए केले होते आणि ते मुंबईत आयटी क्षेत्रात कार्यरत होते. त्यांची पत्नी पूजा गवस चित्रपट निर्मितीत कार्यरत होती. कोविड-१९ काळातील बदलांनंतर त्यांनी आपल्या कोकणात परत येण्याचा निर्णय घेतला आणि ‘रेड सॉईल स्टोरीज’ हा अनोखा प्रकल्प सुरू केला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कोकण आणि सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे.
या जोडप्याच्या सृजनशीलतेने महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. त्यांचे व्हिडिओ ४० हून अधिक देशांतील लोकांनी पाहिले आहेत. त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस काही दिवसांपूर्वी साजरा केला होता आणि त्या व्हिडीओखाली शेकडो चाहत्यांनी आता श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोकणातील इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली. शिरीष गवस यांच्या निधनामुळे एक सृजनशील, कोकणप्रेमी आवाज कायमचा थांबला आहे, पण त्यांच्या कलेद्वारे ते कायम चाहत्यांच्या आठवणीत राहतील.