साखळी : शेतकऱ्यांना 'कृषी सन्मान निधी'चा मोठा दिलासा

गोव्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत २४ कोटी रुपये जमा : मुख्यमंत्री

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
साखळी : शेतकऱ्यांना 'कृषी सन्मान निधी'चा मोठा दिलासा

साखळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी’ योजनेतून गोव्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल २४ कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. साखळी येथे कृषी सन्मान निधीच्या वितरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशभरातील शेतकऱ्यांना या योजनेचा विसावा हप्ता वितरित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे थेट प्रसारण साखळीत पार पडलेल्या कार्यक्रमात दाखवण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदींनी शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी क्रांतिकारक योजना राबविल्या. गोव्यातील शेतकऱ्यांनी समूह शेतीकडे वळून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि 'स्वयंपूर्ण गोवा' या संकल्पनेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कृषी सन्मान निधीमुळे वर्षाला प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात थेट ६,००० रुपये जमा होतात. कष्टकरी शेतकऱ्याला याचे महत्त्व कळते आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटीबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

गोव्यात कृषी खात्याने ४७ विविध योजना राबवल्या असून, यामार्फत अनुदान व सवलतींचा लाभ मोठ्या प्रमाणात दिला जात आहे. क्रेडिट कार्ड, फलोत्पादन योजना आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे यांसारख्या उपाययोजनांनी राज्यात फळ-भाजीपाला उत्पादन व निर्यातीतही वाढ झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यातील फलोत्पादन मंडळांनी शेती क्षेत्रात क्रांती घडवली असून, युवकांनी पुढाकार घेतल्यास गोवा शेतीच्या बाबतीत मोठी झेप घेऊ शकेल. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत, बाजारपेठ, अनुदान आणि सल्ला या सर्व गोष्टी शासनाकडून मिळत आहेत असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, कृषी संचालक संदीप फळदेसाई, सिद्धी प्रभू, आनंद काणेकर, दत्तप्रसाद जोग आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातून आलेले शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा