पुरातत्त्व विभागावर इतिहास अभ्यासक साखरदांडे संतापले!
पणजी : गोव्यातील ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणात घोर निष्काळजीपणा केल्याचा आरोप पुरातत्त्व विभाग वर करत इतिहास अभ्यासक प्रजल साखरदांडे आणि माजी आयएएस अधिकारी एल्विस गोम्स यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. कायद्यानुसार पुरातत्त्वीय वस्तू सापडताच त्याची माहिती संबंधित विभागाला देणे बंधनकारक असताना, गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) आणि एएसआय या दोघांनीही या प्रकरणात उदासीनता दाखवली, असा आरोप त्यांनी केला.
गोम्स यांनी आरटीआयद्वारे मिळवलेल्या कागदपत्रांचा दाखला देत सांगितले की २२ मार्च रोजी जुने गोवेतील एका स्थानी उत्खननादरम्यान तोफगोळे सापडले होते. जीटीडीसीने ही माहिती एएसआयला देणे आवश्यक होते, मात्र त्यांनी ती माहिती लपवली. मी त्याच दिवशी हे प्रकरण अधोरेखित केले होते, पण उत्खनन थांबवले गेले नाही, असे ते म्हणाले. दरम्यान साखरदांडे यांनी एएसआयच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इतर राज्यांत पुरातत्त्व वस्तूंना खजिन्यासारखे जपले जाते. २०० मीटरपर्यंत कोणी फिरकत नाही. पण गोव्यात उत्खनन यंत्राखालीच पुरातन अवशेष येऊन ते नष्ट होतात. पुरातत्त्व अधिकारी कुठे आहेत? केवळ कार्यकर्तेच का आवाज उठवत आहेत? असा सवाल त्यांनी केला.
त्यांनी जुने गोवेतील युनेस्को संरक्षित वारसा स्थळाजवळ सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पाचाही दाखला देत एएसआयची निष्क्रियता उघड केली. दिल्लीहून आलेली पत्रे जीटीडीसीला पुढे पाठवण्याशिवाय ते काहीच करत नाहीत. गोव्यात आपल्याला पत्र पोचवणारे अधिकारी नकोत, तर तळागाळात काम करणारे जबाबदार अधिकारी हवेत, असे साखरदांडे म्हणाले. एएसआय कडून माहिती मिळवताना आलेल्या अडचणींवर बोलताना त्यांनी सांगितले की, ८ रुपयांचा कागद घ्यायचाही त्रास होतो. अर्धा तास भांडावे लागते. माहिती ही सार्वजनिक आहे आणि ती सर्वांसाठी उपलब्ध व्हावी, ती खासगी मालमत्ता नाही असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, या निष्क्रियतेला केवळ एएसआय एकटाच जबाबदार नाही, तर गोवा राज्य पुरातत्त्व विभागही तितकाच दोषी आहे. २१ केंद्रीय संरक्षित स्मारकांखेरीज एएसआयने आतापर्यंत काय अधिसूचित केले आहे? बेतूल किल्ला आणि इतर ठिकाणे आजही अधिसूचित नाहीत. प्रत्येक वेळेस आपण आवाज उठवावा लागतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. येथे सापडलेल्या तोफगोळ्यांची चोरी होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
आंतरराष्ट्रीय बाजारात एका तोफगोळ्याची किंमत तब्बल ५० हजार रुपये असल्याचे ते म्हणाले. एएसआयकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई दिसलेली नाही. तक्रारी आमच्याकडून केल्या जातात, समाजाचा घडक म्हणून आपली इतिहासाशी बांधिलकी आहे म्हणून आपण हे काम करतो, पण जबाबदारी त्यांची आहे. असे साखरदांडे यांनी नमूद केले. या सर्व प्रकाराविरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, तसेच दोषींवर जबाबदारी निश्चित करून गोव्यातील ऐतिहासिक वारसा वाचवण्याची मागणी त्यांनी केली आहे.