आंध्र : तिरूपती मंदिरात थिल्लर 'रील्स' बनवणाऱ्यांवर देवस्थान प्रशासन उगारणार कारवाईचा आसूड!

मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी कठोर निर्णय घेतले जातील : मंदिर प्रशासन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st August, 10:41 am
आंध्र : तिरूपती मंदिरात थिल्लर 'रील्स' बनवणाऱ्यांवर देवस्थान प्रशासन उगारणार कारवाईचा आसूड!

तिरुपती : तिरुमला तिरुपती देवस्थानम्‌ (टीटीडी) प्रशासनाने मंदिर परिसरातील पवित्रतेचा भंग करणाऱ्या सोशल मिडियावरील रील्स आणि व्हिडिओंच्या वाढत्या प्रकारांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. मंदिरात अशोभनीय वर्तन करत रील्स तयार करणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची स्पष्ट चेतावणी टीटीडीने दिली आहे.

अलीकडील घटनांमध्ये, काही जण मंदिर परिसरात सामाजिक मर्यादांची पायमल्ली करत व्हिडिओ शूट करताना आढळले असून, यामुळे इतर भाविकांच्या धार्मिक भावना त्यामुळे  दुखावल्या आहेत. टीटीडीने स्पष्ट केले की, तिरुमला हे केवळ भक्ती आणि आराधनेचे ठिकाण आहे, पर्यटन अथवा करमणुकीचे नव्हे. मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात व्हिडिओग्राफीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात केल्याचे सांगितले आहे.

नियमांचा भंग करणाऱ्यांवर कोणतीही शिथिलता न ठेवता कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. टीटीडीने सर्व भाविकांना मंदिराच्या पवित्र्याचे जतन करण्याचे आणि अनुशासन पाळण्याचे आवाहन केले आहे.