बजरंग दल आणि जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक समितीची संयुक्त कारवाई!
मडगाव : नावेलीतील नागमोडे परिसरात गुरुवारी रात्री बेकायदेशीरपणे रेड्यांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बजरंग दल आणि जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक समितीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत एक मोठा प्रकार उघडकीस आणला. सुमारे ७०० किलो बिफ जप्त करण्यात आले असून, एका रेड्याची सुटका करण्यात आली. मडगाव पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
ही कारवाई रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली. रस्त्यावर सांडलेले रक्त पाहून स्थानिकांनी संशय व्यक्त केला आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली. कार्यकर्ते भगवान रेडकर घटनास्थळी पोहोचले असता, एका टाटा पिकअप रिक्षामध्ये बेकायदेशीर कत्तल करून ठेवलेले रेड्यांचे मांस सापडले. यावेळी जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक समितीचे अधिकारी राज हेदेखील घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी रिक्षामधून सुमारे ७०० किलो बिफ जप्त केले असून, दोन रेड्यांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आल्याचे आढळले. संशयित हैदर बेपारी याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच कत्तलीसाठी आणलेला आणखी एक रेडा पोलिसांच्या मदतीने वाचवण्यात आला आहे. या परिसरात यापूर्वीही अशा प्रकारे बेकायदेशीर कत्तल होत असण्याची शक्यता असून, पोलीस तपास सुरू आहे.