रेंट ए कार, बाईकच्या अपघातात तिपटीहून अधिक वाढ

विधानसभेत माहिती : पाच वर्षांतील आकडेवारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th July, 11:29 pm
रेंट ए कार, बाईकच्या अपघातात तिपटीहून अधिक वाढ

पणजी : राज्यात गेल्या काही वर्षांत रेंट ए कार आणि रेंट ए बाईकच्या अपघातात तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. राज्यात २०२० मध्ये रेंट ए कार, बाईकच्या २७ अपघातांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये ही संख्या वाढून १०१ इतकी झाली आहे. वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत आमदार क्रुझ सिल्वा यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये रेंट ए कारचे १९ तर रेंट बाईकचे ८ अपघात झाले होते. २०२१ मध्ये रेंट ए कारचे ४५ तर रेंट बाईकचे १७ अपघात झाले. २०२२ मध्ये रेंट ए कारचे ३६ तर रेंट बाईकचे ५ अपघात झाले. २०२३ मध्ये रेंट ए कारचे ३९ तर रेंट बाईकचे १५ अपघात झाले. २०२४ मध्ये रेंट ए कारचे ८५ तर रेंट बाईकचे १६ अपघात झाले होते. चालू वर्षात ३० जून २०२५ पर्यंत रेंट ए कारचे ३० तर रेंट बाईकचे ७ अपघात झाले आहेत.
वरील कालावधीत रेंट ए कार आणि रेंट ए बाईकचे मिळून २८५ अपघात झाले आहेत. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ४ हून अधिक अपघातांची नोंद झाली आहे. केंद्रीय वाहन कायदा १९८९ च्या नियम ११८ नुसार रेंट ए कारला स्पीड गव्हर्नर बसवणे आवश्यक आहे. तसेच व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस असणे देखील बंधनकारक आहे. आरटीओकडून वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देताना वरील दोन्ही गोष्टी बसवण्यात आल्याची खात्री करण्यात येत असल्याचे उत्तरात म्हटले आहे.
राज्यात ६,७९६ रेंट कारची नोंदणी
राज्यात ६,७९६ रेंट कारची नोंदणी आहे. यातील सर्वाधिक ४०२५ म्हापसा आरटीओमध्ये नोंद आहेत. त्यानंतर मडगावमध्ये ८९४, पणजीत ६०५ तर मुरगावमध्ये ७०१ रेंट कारची नोंदणी आहे.             

हेही वाचा