क्रेनच्या सहाय्याने टँकर काढला बाहेर
म्हापसा :गौरावाडा, कळंगुट येथील हॉलिडे ट्रीट रस्त्यावर मलनिस्सारण प्रकल्पाच्या चेंबरमुळे रस्ता खचल्याने त्यात सांडपाणीवाहू टँकर रुतला गेला. नंतर क्रेनच्या सहाय्याने हा टँकर बाहेर काढण्यात आला.
ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. कळंगुटमध्ये मलनिस्सारण प्रकल्पाच्या नेटवर्कचे काम सुरू होऊन दहा वर्षे उलटली गेली आहेत. मात्र, हा प्रकल्प अद्याप पूर्णत: कार्यरत झालेला नाही. या प्रकल्पासाठी टाकलेल्या भूमिगत वाहिन्यांमुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्ता खचला जात आहे. विशेषतः सांडपाणी चेंबरजवळ रस्ता खचून मोठे खड्डे पडतात.
हल्लीच गौरावाडा येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत स्थानिक काँग्रेस गट समितीने आवाज उठवला होता. त्यानंतर पेव्हर्स घालून सांबाखाने हे खड्डे बुजवले होते. मात्र, शनिवारी पेव्हर्स घातलेला रस्ताच खचला गेला आणि त्यात सांडपाणीवाहू ट्रक रुतला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली गेली.