पोलिसांच्या आजारपणावर १ कोटी ९२ हजार रुपये खर्च
म्हापसा : गोवा पोलीस खात्यातील ५ पोलीस कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत आत्महत्या केली आहे. तर, स्वेच्छानिवृत्ती आणि राजीनामा देत ३८ पोलीस कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे.
पावसाळी विधानसभा अधिवेशनात आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी विचारलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि शिस्तपालन विषयक कार्यवाही या प्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लिखित उत्तराच्यामार्फत वरील माहिती दिली आहे.
२०२२ पासून मागील ३ वर्षे ३ महिन्यांच्या कालावधीत १० हजार ७४४ पोलीस कर्मचारी आजारपणाच्या रजेवर पाठवण्यात आले. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाशी संबंधित समस्या, पोटाच्या समस्या, रक्तदाब, विषाणूजन्य ताप, फ्रॅक्चर, अस्थिबंधन फाटणे, अतिसार, मूत्रपिंडातील खडा, कंबरदुखी, घशाची समस्या, उलट्या, मूळव्याध, छातीत दुखणे, गुडघ्याच्या दुखापती यासारख्या आजारांचा समावेश आहे. या आजारासाठी पोलीस कर्मचाऱ्यांवर १ कोटी ९२ हजार ९१४ रुपये रक्कम खर्च करण्यात आली आहे.
या काळात पोलीस खात्याकडून १२ पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर, १०७ जणांचे निलंबन केले असून त्यातील ८० पोलिसांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले. एकाही कर्मचाऱ्याचे पदावनत केलेले नाही.
५ वर्षांत बदल्याविना कार्यरत ३७८ पोलीस
गेल्या पाच वर्षांत एकूण ३७८ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली झालेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार चंद्रकांत शेट्ये यांच्या प्रश्नावर दिली आहे.