देविदास कानोळकर खून प्रकरणी दोघांवर आरोप निश्चित, एक दोषमुक्त

दाडाचीवाडी धारगळ येथे २०२४ मध्ये झाला होता खून

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th July, 12:00 am
देविदास कानोळकर खून प्रकरणी दोघांवर आरोप निश्चित, एक दोषमुक्त

म्हापसा : दाडाचीवाडी धारगळ येथे घडलेल्या देविदास कानोळकर खून प्रकरणातील संशयित आरोपी करूवा सिंग याची म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली. तर, न्यायालयाने मोहित कुमार व अभिषेक कुमार या दोघांवर आरोप निश्चित केले.

दि. १२ मे २०२४ रोजी खुनाची घटना घडली होती. तिन्ही संशयित आरोपी नागझरहून धारगळकडे मालवाहू रिक्षाने जात होते. दाडाचीवाडी धारगळ येथे पोहोचताच संशयितांनी समोरून जाणाऱ्या दुचाकीला मागून धडक दिली. यामुळे गंभीर दुखापत होऊन दुचाकीस्वार देविदास कानोळकर याचा उपचारादरम्यान इस्पितळात मृत्यू झाला होता.

याप्रकरणी पेडणे पोलिसांनी वरील संशयितांना अटक केली होती. फिर्यादी पक्षाचा खटला असा होता की, देविदास कानोळकर याने संशयित आरोपी अभिषेकच्या थोबाडीत मारली आणि नंतर तो त्याच्या निवासस्थानाकडे दुचाकीने चालला होता. त्यानंतर संशयितांनी समान हेतूने त्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि सूड घेण्यासाठी जाणूनबुजून त्याच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला आणि संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते.

संशयितांच्या वकिलांनी सांगितले की, संपूर्ण खटला हा मृताच्या जबाबावर आधारित आहे. ज्याने साक्षीदाराला भेटून घटनेबद्दल सांगितले होते आणि मृताचा जबाब हा एकीव पुराव्यावर आहे. तो न्यायालयात ग्राह्य धरता येत नाही. संशयितांच्या वकिलांनी असेही म्हटले की, अपघातस्थळी आढळलेल्या ब्रेकच्या मार्क्सवरून वाहन चालकाने योग्य काळजी आणि सावधगिरी बाळगल्याचे स्पष्ट होते. त्यात खुनाचा आरोप लावण्यासाठी कोणताही घटक नाही.

तथापी, सरकारी वकिलांनी सांगितले की, आरोपींची गुंतागुंत दाखवणारे भरपूर परिस्थितीजन्य पुरावे आहेत. ज्यात दोन्ही वाहनांचे नुकसान समाविष्ट आहे. तसेच डांबरी रस्त्याच्या बाजूला बॅरिकेड होते. थोडीशी धडक बसल्यास देविदासला ती अत्यंत धोकादायक आहे, याची जाणीव संशयिताला होती.

न्यायालयाने मोहित कुमार आणि अभिषेक कुमार या दोघांचा सशर्त जामीन अर्ज मंजूर केला. प्रत्येकी २० हजार रूपये हमी रक्कम व तितक्याच रकमेचा हमीदार, न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर न जाणे व इतर विविध अटी लागू करण्यात आल्या आहेत.

न्यायालयात संशयितांच्यावतीने अॅड. गोपाळ काणेकर, अॅड. सिद्धी नाईक, अॅड. जे. दिवकर व अॅड. वर्षा भिवशेट तर, सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील आर. बार्रेटो यांनी युक्तीवाद केला.

करूवा सिंगवरील आरोपांना पुरावा नाही!

दोन्ही पक्षांचे युक्तीवाद एेकल्यानंतर, न्यायाधीश राम सुब्राय प्रभू देसाई यांनी आरोपी करूवा सिंगला दोषमुक्त केले. रेकॉर्डवरील सामग्री त्याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी कोणताही गंभीर किंवा मजबूत संशय निर्माण करत नाही. तर, न्यायालयाने आरोपी मोहित आणि अभिषेक विरुद्ध आरोप निश्चित केले.