पंकज सचदेवाला अटक : कांदोळीतील कॅसिनोला ६.७५ लाखांचा गंडा
म्हापसा : साळपे कांदोळी येथील फिनिक्स कॅसिनोमध्ये खेळायला आलेल्या दिल्लीस्थित मित्राच्या संमतीशिवाय कॅश डेस्कवरून पैसे घेऊन कॅसिनोला ६.७५ लाखांचा गंडा घालून पसार झालेला संशयित आरोपी पंकज सचदेवा (४०, रा. हरियाणा) याला कळंगुट पोलिसांनी अटक केली. त्याला म्हापसा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फसवणुकीचा प्रकार दि.२७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३९ वा. सुमारास घडला होता. याप्रकरणी फिनिक्स कॅसिनोचे व्यवस्थापक लॉयल डिसोझा यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पंकज सचदेवा व तनिष्क बन्सल हे दोघेही साळपे कांदोळी येथील हिल्टन रिसॉर्टमध्ये असलेल्या फिनिक्स कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी यायचे. कालांतराने त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. ते सोबतच कॅसिनोत पैसे लावायचे. शिवाय तनिष्क याच्या सूचनेवरून पंकज सचदेवा हा अधूनमधून कॅसिनो गीफ्ट चिप्स कॅश डेस्कवरून खेळण्यासाठी आणायचा. घटनेच्या दिवशी तनिष्क बन्सल हा गीफ्ट चिप्स घेऊन रोख पैसे आणण्यासाठी कॅसिनोच्या कॅश डेस्कवर गेला. त्याने त्या चिप्स डेस्कवर ठेवल्या. त्याचवेळी त्याला एक कॉल आल्याने मोबाईलवर बोलत तो बाजूला गेला. ही संधी साधून सचदेवा हा कॅश डेस्कवर गेला व बन्सल याने पैसे आणायला सांगितल्याचे सांगून त्याने ६ लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम घेतली. त्यातील ४ लाख रुपये त्याने कॅसिनोत घालवले आणि शिल्लक असलेले २ लाख ७५ हजार रुपये रक्कम घेऊन तो पसार झाला.
फोनवरील संभाषण संपल्यानंतर तनिष्क बन्सल कॅश डेस्कवर आला असता डेस्कवरील कर्मचाऱ्यांनी पंकज सचदेवा याने रक्कम नेल्याचे सांगितले. त्यानंतर कॅसिनोत त्याचा शोध घेतला असता तो गायब होता. चौकशीवेळी त्याने घेतलेल्या रकमेतील ४ लाख रुपये खेळात गमावले. नंतर तो शिल्लक रक्कम घेऊन बाहेर गेल्याचे समजले. हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कॅसिनोच्या व्यवस्थापकांनी कळंगुट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भा.न्या.सं.च्या ३१८(४) कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा संशयिताविरुद्ध नोंद केला व चौकशी सुरू केली.
संशयित हरियाणातून ताब्यात
संशयित आपल्या हरियाणा येथील मुळ गावी असल्याची माहिती पोलिसांना मिळताच कळंगुट पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने त्याला पकडून अटक केली. पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे व निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिष वायंगणकर, कॉ. विजय नाईक व गौरव चोडणकर यांनी ही कामगिरी केली.