तामिळनाडूतील पाच जणांना अटक
म्हापसा : सिकेरी येथे समुद्रकिनारी गळ घालून मासे पकडणाऱ्या दोघा स्थानिक युवकांवर सुरी व कात्रीने हल्ल्याचा प्रकार देशी पर्यटकांकडून घडला. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी तामिळनाडूतील ५ जणांच्या पर्यटक गटाला अटक केली.
शाकिर (२५), शाका विल (२८), कुमार (२९), तामिळ सेलवाल (२२) व एस. सुदाकर (४२, रा. सर्व तामिळनाडू) अशी संशयितांची नावे आहेत.
हा प्रकार शुक्रवारी दुपारी १२.३० वा. सुमारास घडला. फिर्यादी ज्ञानेश्वर भास्कर शिरोडकर (रा. मरड, कांदोळी) व त्याचा मित्र बर्नार्ड हे दोघे सिकेरी येथे आग्वाद किल्ल्यास्थळी असलेल्या ताज हॉटेलजवळ फिशिंग टॅकलद्वारे गळ घालून मासे पकडत होते. यावेळी तिथून संशयित आरोपी जात होते. त्यांनी फिर्यादीकडील फिशिंग टॅकल काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने नकार देताच संशयितांनी जबरदस्तीने ती हिसकावली असता त्यांच्यात वाद झाला. याचे पर्यावसन शिवीगाळ व मारहाणीत झाले. नंतर संशयित शाकिर याने तक्रारदारावर सुरी हल्ला केला. तर संशयित कुमार व एस. सुदाकर यांनी फिर्यादीला पकडून रोखून धरले आणि जीवे मारणयाची धमकी दिली. तसेच संशयित शाका विल याने फिर्यादीचा मित्र बर्नार्ड याच्यावर कात्रीने हल्ला केला. चौघाही संशयितांनी फिर्यादींना मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितांना पकडले. पोलीस स्थानकावर आणून ज्ञानेश्वर शिरोडकर यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. दोघाही जखमींवर कांदोळी आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.