दोघांची फसवणूक : सायबर विभागाची कारवाई
पणजी : गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने दोन वेगवेगळ्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. २५.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणी एस. रमेश (बंगळुरू - कर्नाटक) तर, ९७ लाखांच्या फसवणूक प्रकरणी अर्षाद आय्युष शेख (सूरत - गुजरात) याला अटक केली आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुरगाव तालुक्यातील एका व्यक्तीने ३१ मे २०२५ रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार, तक्रारदाराला टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) आणि सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवून वॉट्सअॅप काॅलद्वारे अज्ञाताने संपर्क साधला. त्याने तुमच्या आधार कार्डचा वापर मनी लाँड्रिंगसाठी झाला असल्याचे सांगितले. तुमची चौकशी करायची असल्याचे सांगून त्याला ‘डिजिटल अरेस्ट’ केले. प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यांमध्ये २५.५० लाख रुपये भरण्यास त्याला भाग पाडले. यानंतर सायबर विभागाने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, वरील रक्कम बंगळुरु येथील एका व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार, उपनिरीक्षक मंदार गावकर, हवालदार विराज नार्वेकर आणि कॉ. शशांक गावडे यांचे पथक रवाना करण्यात आले. पथकाने संशयित एस. राकेश याला ताब्यात घेऊन गोव्यात आणून अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याच्या बँक खात्यात अशाच प्रकारे फसवणूक करून
विविध राज्यांतून ११ कोटी ३३ लाख ५६ हजार ४३८ रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे.
दुसऱ्या प्रकरणात, दोनापावला येथील एका ज्येष्ठ महिलेची ९७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. महिलेने २५ जून रोजी सायबर विभागात तक्रार दाखल केली. तिला २१ जूनपासून ट्राय आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तींनी वेगवेगळ्या वॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधला. तक्रारदाराचा मोबाईल क्रमांक मानवी तस्करीच्या कारवायांशी जोडला गेल्याची भीती दाखवली. हे प्रकरण मिटवण्यासाठी दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ९७ लाख जमा करण्यास भाग पाडले. या प्रकरणाची दखल घेऊन सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सुरत - गुजरात येथील एका व्यक्तीच्या खात्यात वरील रकमेपैकी ५१ लाख जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार, उपनिरीक्षक नवीन नाईक, कॉ. सुनील रेनाटी आणि यश कोळे या पथकाला सुरतमध्ये रवाना करण्यात आले. पथकाने अर्षाद आय्युष शेख याचा शोध घेऊन गोव्यात आणले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. विविध राज्यांतून त्याच्या बँक खात्यात १ कोटी २० लाख ५७ हजार ४७ रुपये जमा झाल्याचे समोर आले. वरील दोन्ही प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर करीत आहेत.
‘डिजिटल अरेस्ट’ चा बनाव करुन फसवणूक
गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने ‘डिजिटल अरेस्ट’ चा बनाव रचून लोकांकडून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. एकाला बंगळुरू तर दुसऱ्या संशयिताला सूरत येथून अटक केली.