नदीच्या पाणी पातळीत वाढ : ठाणे येथे घरावर झाड पडून ५० हजारांची हानी
वाळपई : सत्तरी तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका बसल्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. ठाणे येथील रुपेश मालसुरे यांच्या घरावर झाड पडल्यामुळे सुमारे ५० हजार रुपयांची हानी झाली. अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांचे नुकसान झाले.
ठाणे सत्तरी येथील साईबाबा मंदिराच्या शेजारी असलेल्या रुपेश मालुसरे यांच्या घरावर झाड पडल्यामुळे छपराचे नुकसान झाले. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी ताबडतोब सदर ठिकाणी धाव घेतली. कृष्णा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घरावरील झाड हटविण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलामुळे १ लाख रुपयांची मालमत्ता वाचली.
वीज वाहिन्यांवर झाडे पडून नुकसान
सत्तरी तालुक्याच्या अनेक भागांमध्ये वीज वाहिन्यांवर जंगली झाडे पडल्यामुळे वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. अनेक भागातील वीज पुरवठा ठप्प झाला. धामसे सत्तरी येथील वीज वाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे वीज वाहिन्या तुटल्या. प्रदीप गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर झाड हटविण्यात आले. वीज पुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी वीज खात्याचे कर्मचारी काम करीत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
ब्रह्मकरमळी वाळवंटी येथील वीज वाहिन्यांवर व रस्त्यावर झाड पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. अग्निशामक दलाचे प्रदीप गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाड हटविल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
शेळपे सत्तरी येथील वीजवाहिन्यांवर आंब्याचे झाड पडल्यामुळे वीज वाहिन्यांची हानी झाली. भारतीय रिझर्व बटालियनच्या वाळपई येथील वसतिगृहाच्या ठिकाणी झाड पडले. बागवाडा मोर्ले येथे नारळाचे झाड पडून हानी झाली.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे वाळवंटी, रगाडा, म्हादई नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
वन प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीवर झाड पडले
वाळपई वन प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीवर झाड पडल्यामुळे इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झाले. हा प्रकार सकाळी ११ वजण्याच्या सुमारास घडला. अग्निशामक दलाच्या यंत्रणेला माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन पडलेले झाड हटविले.