कोलवा पोलिसांकडून सहा पर्यटकांना अटक, न्यायालयीन कोठडी
मडगाव : कोलवा समुद्र किनारी खवळलेल्या समुद्रात जाण्यापासून रोखल्याने तामिळनाडूतील पर्यटकांनी पर्यटक पोलिसांसोबत वाद घातला. यावेळी पर्यटक व पोलिसांत हाणामारीही झाली. पोलिसांनी सहा पर्यटकांना अटक केल्यावर त्यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
याप्रकरणी कोलवा पोलिसांनी तामिळनाडूतील संशयित चिंताथांबी मुथुकृष्णन (२६), विष्णू प्रभू पी. (१८), तिरुपथी वेंकटेश (२०), महेंद्रन मुथू (२१), श्यामकुमार पोन्नुसामी (२०), सरवनन पी. (२०) यांना अटक केली. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तामिळनाडूतील काही पर्यटकांचा गट गोव्यात मौजमजेसाठी आला होता. गुरुवारी हे पर्यटक कोलवा किनारी भागात फिरायला आले होते. त्यांनी खवळलेल्या समुद्रात पोहण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करताच किनारी भागात तैनात जीवरक्षकांनी त्यांना रोखले. पर्यटक पोलिसांनी या प्रकारात मध्यस्थी केली. त्यावेळी पर्यटक चिंताथांबी मुथुकृष्णन यांनी पोलिसांच्या कॉलरला हात घातला व मानेलाही जखम करत पोलिसांना धक्काबुक्की केली. यानंतर कोलवा पोलिसांकडून पोलिसांना मारहाण करणार्या पर्यटकांना ताब्यात घेत गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी कोलवा पोलीस पुढील तपास करीत आहेत. संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आल्यावर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.