कुंकळ्ळी पोलीस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल
मडगाव : रंगाळी-बेतुल येथे रविवारी दोन गटांत हाणामारी झाली होती. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलीस स्थानकात गणेश केरकर व सचिन जुवेकर यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. यानुसार पोलिसांनी गुन्हे नोंद केलेले आहेत.
वेळ्ळीतील रंगाळी-बेतुल येथील श्री गोपाल कृष्ण मंदिराची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत येथील एका मंदिरात सुरू असलेल्या वादावर तोडगा काढला जाणार होता. मात्र, तोडगा काढण्याऐवजी बैठकीत वाद सुरू झाला व वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत काहीजण जखमी झाले होते. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी गणेश केरकर यांनी केलेल्या तक्रारीत संशयित सचिन जुवेकर, संदेश जुवेकर, संकल्प जुवेकर, संजोग जुवेकर, दीप्तेश मोटे, विलास केरकर, विराज मोटे (सर्व रा. वेळळी) यांनी वडील राजेंद्र केरकर व शेजारी अमर खावणेकर यांना मारहाण केली. याशिवाय महिलांना धक्काबुक्की व वाईट वर्तन केल्याचे म्हटले. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक साहिल पागी तपास करीत आहेत.
दरम्यान, सचिन जुवेकर यांनी केलेल्या तक्रारीत संशयित राजेंद्र केरकर, अमर खावणेकर, अजय खावणेकर, अक्षय खावणेकर, अमित कोंडेकर, सावनी केरकर, सानिका केरकर, गणेश केरकर, वनिता खावणेकर, जगजीत खावणेकर, जानवी खावणेकर, अंश खावणेकर, यश खावणेकर, निवृत्ती केळुस्कर, सिद्धेश जुवाटकर (रा. सर्व वेळ्ळी) यांनी मंदिराच्या ट्रस्टीना दांडा, लोखंडी रॉड याचा वापर करत मारहाण केली. मंदिराच्या खुर्च्या, दुचाकी व कारचेही नुकसान करत मारण्याची धमकी दिली. याशिवाय महिलांशी गैरवर्तन केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलीस उपनिरीक्षक रियांका नाईक तपास करीत आहेत.