६३ वर्षीय महिलेवर बलात्कार; २२ वर्षीय युवकाला १० वर्षांची शिक्षा

१.२६ लाख रुपये दंड : आरोपीच्या केसांसह रक्ताचा अहवाल सकारात्मक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22 hours ago
६३ वर्षीय महिलेवर बलात्कार; २२ वर्षीय युवकाला १० वर्षांची शिक्षा

पणजी : घटनास्थळी उशी आणि बेडशीटवर आढळलेले आरोपीचे केस आणि रक्ताचा अहवाल सकारात्मक आला आहे, असे निरीक्षण नोंदवून बार्देश तालुक्यात डिसेंबर २०१९ मध्ये एका रिसॉर्ट मालकिणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मूळ मिझोरम येथील कर्मचाऱ्याला १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १.२६ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. याबाबतचा आदेश पणजी येथील जलदगती न्यायालयाच्या न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला आहे.

या प्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. रिसोर्टच्या मालकाने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तक्रारदार आणि त्याची ६३ वर्षीय पत्नी तथा पीडित महिला १६ डिसेंबर २०१९ रोजी गोव्यात त्याच्या रिसोर्टमध्ये राहण्यासाठी आले होते. १८ डिसेंबर २०१९ रोजी उत्तररात्री २ वाजता महिला रिसॉर्टमधील एका खोलीत झोपली होती. त्यावेळी मूळ मिझोरम येथील २२ वर्षीय रिसॉर्टच्या कर्मचाऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी आरोपीने तिचे उशीने तोंड बंद केले होते. त्यावेळी तिने प्रतिकार करत त्याला जखमी केले होते. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. या प्रकरणी हणजूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमीर तरल यांनी गुन्हा नोंद करून १८ डिसेंबर २०१९ रोजी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली. तरल यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच इतर पुरावे गोळा केले. तपास पूर्ण करून १४ फेब्रुवारी २०२० रोजी न्यायालयात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने आरोपी विरोधातील प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन ३० मे २०२२ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला. न्यायालयात सरकारी अभियोक्ता अॅना मेडोंका यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यात त्यांनी घटनास्थळी उशी आणि बेडशीटवर आढळलेले आरोपीचे केस आणि रक्ताचा अहवाल सकारात्मक आल्याचे न्यायालयाला सांगितले. पीडित महिला व इतरांनी दिलेली साक्ष तसेच इतर पुराव्यांच्या आधारे आरोपी विरोधातील पुरावे सिद्ध केले. या प्रकरणी न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून आरोपीला १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १.२६ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा

भा.दं.सं.च्या कलम ३४२ अंतर्गत १ वर्षांची साधी कैद आणि १ हजार रुपयांचा दंड. दंड न भरल्यास दोन दिवसांची साधी कैद.

भा.दं.सं.च्या कलम ५०६(ii) अंतर्गत ७ वर्षे साधी कैद आणि २५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद.

भा.दं.सं.च्या कलम ३७६ अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिन्याचा सश्रम कारावास.

भा.दं.सं.च्या कलम ३०७ अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिन्यांचा सश्रम कारावास.

सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. दंडाची रक्कम भरल्यास पीडित महिलेला देण्याचा आदेश दिला आहे.