कांदोळीत रॉटविलर कुत्र्याचा वृद्धावर हल्ला

कळंगुट पोलिसांत कुत्र्याच्या मालकावर गुन्हा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th July, 12:05 am
कांदोळीत रॉटविलर कुत्र्याचा वृद्धावर हल्ला

म्हापसा : आनावाडा कांदोळी येथे मार्कुस मचाडो या ६० वर्षीय वृद्ध नागरिकावर रॉटविलर कुत्र्याने हल्ला करीत जखमी केले. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी कुत्र्याचे मालक गुरूदत्त लवंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्यात पाळण्यास बंदी घातलेल्या हिंस्त्र प्राण्यांमध्ये रॉटविलर कुत्र्याचा समावेश आहे.

ही घटना दि. २३ रोजी सकाळी ९.४५ वा. सुमारास घडली होती. मार्कुस हे कांदोळी मार्केटमध्ये गेले होते. तिथून ते चालत घरी जात होते. पायवाटेवरून जाताना संशयिताच्या घराजवळ पोहोचताच अचानक रॉटविलर कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करीत त्यांच्या पायाचा चावा घेतला.

त्यांचा आरडाओरडा ऐकून कुत्र्याच्या मालक कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. मार्कुस यांना कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. त्यांना लगेच कांदोळी आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. गुरुवार, २४ रोजी रात्री पीडित फिर्यादींच्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी पोलिसांनी रॉटविलर कुत्र्याच्या मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ) व २९१ कलमान्वये गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी संशयित गुरूदत्त लवंदे यांना नोटीस बजावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश कानोळकर हे करीत आहेत.