वास्को सप्ताह काळात खबरदारीसाठी घेतला निर्णय
वास्को : मुरगाव पालिकेने वास्को सप्ताह काळासाठी वीस कोटींचा विमा उतरविला आहे. तर, श्री दामोदर भजनी सप्ताह समितीने मंदिर परिसरासाठी तीन कोटींचा विमा उतरविला आहे. जत्रेसाठी विमा उतरविणारे गोव्यातील हे पहिलेच उदाहरण आहे. देशभरात तसेच गोव्यातील लईराई जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे काहीजणांना मृत्यू झाल्याने खबरदारी म्हणून मुरगाव पालिका व सप्ताह समितीने सदर पाऊल उचलले आहे. एकंदर २३ कोटी २५ लाखांचा विमा उतरविण्यात आला आहे.
नगराध्यक्ष गिरिष बोरकर यांनी सदर विमा उतरविण्याची गरज का भासली यामागील कारण सांगितले. वास्को सप्ताहासाठी हजारो भाविक गोवा तसेच इतर राज्यांतून वास्कोत येतात. गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्याने काहीजणांना मृत्यू जाला. मात्र, येथे देवाच्या आशीर्वादामुळे अशी घटना यापूर्वी घडली नाही आणि घडणारही नाही. तथापी एक खबरदारी म्हणून आम्ही जत्रेत येणाऱ्या लोकांचा विमा उतरविला आहे. वीस कोटींचा विमा उतरविण्यात आला आहे. एखादी वाईट घटना घडल्यास संबंधितांना काही तरी हातभार लागावा यासाठी सदर विमा उतरविण्यात आला आहे. आम्ही स्वातंत्र्य पथावरील हिरालाल ठक्कर इमारत ते नॅशनल फार्मसीपर्यंत तर सेंट जोसेफ वाझ मार्गावरील अपना बझार ते सेंट अँड्यूसमोरील तिढा पर्यंत हा विमा असेल, असे त्यांनी सांगितले.
गोबी मंच्युरिअन विक्री करणाऱ्यांमुळे काही ठिकाणी घाण होत असे. त्यासाठी त्यांना बालोद्यानाच्या लगतच्या फूड कोर्टच्या जागेत जागा देण्यात आली आहे. त्या विक्रेत्यांनी तेथे गोबी मंच्युरिअन तयार करून आपल्या दुकानात आणली पाहिजे. तथापी तेथे खबरदारीची उपाययोजना म्हणून तेथे आम्ही पंचवीस लाखाचा विमा उतरविला असल्याचे ते म्हणाले.
दामोदर भजनी सप्ताह समितीकडून ३ कोटींचा विमा
श्री दामोदर भजनी सप्ताह समितीनेही स्वातंत्र्य पथावरील सुप्रीम हॉटेल ते लापाझ हॉटेलपर्यंतच्या भागासाठी विमा उतरविला आहे. या भागात मंदिर येते. त्यामुळे तेथे भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने रांगेत उभे राहतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून समितीने तीन कोटींचा विमा काढला आहे. मुरगाव पालिका व समितीने घेतलेल्या या खबरदारीबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.