विविध सरकारी खात्यांत ७,५९१ पदे रिक्त

विजय सरदेसाई यांच्या अतारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट


21st July, 11:56 pm
विविध सरकारी खात्यांत ७,५९१ पदे रिक्त

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विविध सरकारी खाती, जिल्हाधिकारी कार्यालये, न्यायालये, न्यायाधिकरणात ७,५९१ पदे रिक्त आहेत. सर्वाधिक १,२६० जागा पोलीस आणि आयआरबीमधील आहेत. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलच्या ३६१, पोलीस उपनिरीक्षकाच्या २१६, पोलीस कॉन्स्टेबल (एबी-आयआरबी) १०८ जागांचा समावेश आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत आमदार विजय सरदेसाई यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, आयआरबीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल (वायरलेस) ६६ जागा, पोलीस खात्यात हेड कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या ग्रेड २ च्या ५८, तर कॉन्स्टेबल ड्रायव्हर ग्रेड ३ च्या ३४ जागा रिक्त आहेत. विविध प्रकारच्या साहाय्यक उपनिरीक्षकाच्या ४ जागा रिक्त आहेत. याशिवाय मेकॅनिक, क्लार्क, आचारी, ड्रायव्हर, नर्स, वेल्डर, अशी विविध पदे रिक्त आहेत. अधिकारी पदांमध्ये पोलीस अधीक्षक (जीपीएस) २, पोलीस उपअधीक्षक ३८, तर पोलीस निरीक्षकाची ३ पदे रिक्त आहेत.
उत्तरानुसार, शिक्षण खात्यात एकूण ६७९ रिक्त जागा आहेत. यामध्ये सरकारी प्राथमिक शाळेतील ३४७ शिक्षकांच्या जागांचा समावेश आहे. साहाय्यक जिल्हा शैक्षणिक निरीक्षकाची (एडीईआय) २१४ पदे रिक्त आहेत. साहाय्यक शिक्षकांची १७७, उपप्राचार्य, मुख्याध्यापकांची २७, चित्रकला शिक्षकांच्या २९, एलडीसी आणि यूडीसीच्या ४४, इंग्रजी शिक्षकांची १४, संगणक शिक्षकांच्या ३ जागा रिक्त आहेत.
वीज खात्यात १,०१४ पदे रिक्त
आरोग्य खात्यात ३७५, गोमेकॉमध्ये ५०, वन खात्यात ३२२, व्यावसायिक कर विभागात १४७, क्रीडा खात्यात ८५, सार्वजनिक बांधकाम खात्यात २४२, वीज खात्यात १,०१४, जलस्रोत खात्यात १३२, तर कला आणि संस्कृती खात्यात १३१ पदे रिक्त आहेत.

चार वर्षात अनारक्षित (सामान्य) गटातील ३९८७ पदांची भरती                  

उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने मागील चार वर्षात आरक्षित नसणाऱ्या म्हणजेच सामान्य गटातील ३,९८७ पदांवर भरती केली आहे. ही सर्व पदे कायमस्वरूपी पद्धतीने भरण्यात आली आहेत. यातील सर्वाधिक ७१४ पदे ही वीज खात्यातील होती.