पिल्लई यांच्यासाठी राजभवन झाले सामाजिक, सांस्कृतिक केंद्र : मुख्यमंत्री

राज्यपालांना मुख्यमंत्री, मंत्र्यांकडून निरोप


20th July, 11:54 pm
पिल्लई यांच्यासाठी राजभवन झाले सामाजिक, सांस्कृतिक केंद्र : मुख्यमंत्री

राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांना समई देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
....
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच राजभवनातून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य केले. त्यांच्यामुळे राजभवन हे सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बनले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
राज्यपाल पिल्लई यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकार तसेच मंत्री, आमदारांच्या वतीने निरोप देण्यात आला. यानिमित्त आयोजित छोटेखानी सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम, मंत्री, सरकारला पाठिंबा दिलेले आमदार उपस्थित होते.
राज्यपाल पिल्लई यांनी साहित्यासह आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम केले. विकसित गोवा २०३७ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.
पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याचे १९ वे राज्यपाल म्हणून १५ जुलै २०२१ रोजी पदभार स्वीकारला होता. चार वर्षे ते गोव्याचे राज्यपाल होते. गोव्यात राज्यपाल म्हणून बदली होण्यापूर्वी ते मिझोरामचे राज्यपाल होते. राज्यपाल म्हणून गोव्यातील गावांना भेटी देण्यासह त्यांनी मंदिरे तसेच चर्चना भेटी देऊन पुस्तके लिहिली. पुस्तकांच्या रॉयल्टीची रक्कम त्यांनी ‘अन्नधन’ योजनेसाठी वापरली.
माजी केंद्रीय मंत्री पुसापती अशोक गजपती राजू यांची केंद्र सरकारने गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. नव्या राज्यपालांचा २६ जुलै राेजी शपथविधी होणार आहे.